#विविधा: वाह ताज बोलिये…   

अश्‍विनी महामुनी 
टीव्हीवर पूर्वी नेहमी लागणारी उस्ताद झाकिर हुसेन यांची जाहिरात मला फार आवडायची. ताजमहाल चहाची जाहिरात. मुळात उस्तादजी हे व्यक्‍तिमत्त्वच अतिशय प्रसन्न आहे. एक तबला नवाज म्हणून तर त्यांची जगभर ख्याती आहे. अजातशत्रू, कधीही कोणत्याही चर्चेत नसलेले उस्तादजी-त्यांचे तबलावादन जेवढे श्रवणीय तेवढेच त्यांचे व्यक्‍तिमत्त्वही प्रसन्न. उस्ताद झाकिर हुसेनजी काय, पंडित शिवकुमार शर्मा काय, शहनाई नवाज बिस्मिल्लाखान काय…. या महान कलाकारांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळाच निर्व्याजपणा जाणवतो. त्यांच्या हसण्याने आजूबाजूलाही प्रसन्नपणा पसरतो. एखाद्या बालकाचे निष्पापपण त्यांच्या चेहऱ्यावर सतत जाणवते. त्यामुळेच उस्ताद झाकिर हुसेन यांची ती जाहिरात-ताजमहाल चहाची-अत्यंत लोकप्रिय होती. आम्ही तर त्या जाहिरातीचे रेकॉर्डिंग करून ठेवले होते. मनाला येईल तेव्हा कधीही पाहायचो. त्यातला छोकरा आदित्य कल्याणपूर उस्ताद झकिर हुसन यांच्या पिताजींचा म्हणजे उस्ताद अल्लारखां यांचा शिष्य. म्हणजे झाकिर हुसेन यांचा गुरूबंधूच!
अरे हुजूर, वाह ताज बोलिये’ एवढे एकच वाक्‍य ताजमहाल चहा घराघरात पोहचवायला पुरेसे होते. अनेक वर्षे उस्तादजी ताजमहाल चहाबरोबर टीव्हीवर दिसत. मला वाटते उस्तादजींनीच प्रथम ताजमहालची जाहिरात टीव्हीवर केली आणि ती दीर्घकाळ चालली. त्यानंतर पंडित राहूल शर्मा यांनीही अरे हुजूर, वाह ताज बोलिये म्ह्टले.
काश्‍मीरच्या स्वर्गसुंदर वातावरणात त्या रम्य दाल लेकमध्ये पंडितजी संतूरच्या तारा छेडतात आणि शिकारा चालवणारा नावाडी अगदी उस्फूर्तपणे वाह उस्ताद म्हणतो, त्यावर पंडित राहूल शर्मा म्हणतात अरे हुजूर, वाह ताज बोलिये.
आता हे वाह ताज आठवण्याचे कारण ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स. टाटा समूहाचा. त्यांच्याबद्दल एक पोस्ट वाचली. अलीकडेच. एक फार चांगली, क्‍लासिक म्हणावी अशी पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली आहे. कोणाही भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून यावे अशी ती पोस्ट आहे.
भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याला आलेल्या आगळ्या अनुभवाची-तो अनुभव वाचणारालाही अविस्मरणीय. आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते, अरे हुजूर, वाह ताज बोलिये- ताजमहाल चहाला नाही, तर ताज हॉटेलला आणि त्याहून जास्त टाटा ग्रुपला. एका लष्करी अधिकाऱ्याला प्रजासत्ताक दिन परेडसाठी दिल्लीत जायचे होते. दोन रात्रींचा मुक्कम असल्याने तो हॉटेल ताजमध्ये उतरला.
संध्याकाळी त्याने रिसेप्शनला फोन करून आपला ड्रेस इस्त्रीला द्यायचा म्हणून सांगितले. रूम बॉय आल्यानंतर त्याला इस्त्रीसाठी ड्रेस दिला. लष्करी ड्रेस पाहून रूमबॉय मोठा आश्‍चर्यमिश्रित आनंद झाला. “सर, आपण लष्करात आहात का?’ त्याने विचारले. होय, मी उत्तर दिले. त्याने ताबडतोब खिशातून मोबाइल काढला आणि विचारले, ” मी आपल्याबरोबर सेल्फी घेऊ शकतो का?’ मी मोठ्या खुशीने सेल्फी दिली. त्याने सेल्फी झाल्यावर मला एक कडक सलाम ठोकला आणि जय हिंद म्हणून तो माझा ड्रेस घेऊन गेला. काही वेळाने दोन छोट्या मुली आल्या. हाती पुष्पगुच्छ घेऊन. त्यानीही सेल्फी घेतल्या. हा अनुभव वेगळा होता.
खरी गंमत आली रात्री जेवताना. रिसेप्शनने मला फोन करून सांगितले की आपण डिनरसाठी खाली यावे. मी गेलो. सारी व्यवस्था ताजच्या दर्जाप्रमाणे सुंदर होतीच, पण व्यवस्थापक आणि स्टाफने माझे स्वागत करून पुष्पगुच्छ दिला आणि म्हटले, “आपण आमच्या हॉटेलमध्ये आलात ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपले मन:पूर्वक स्वागत आहे.” त्याने माझ्यासोबत डिनर घेतले.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनला जाण्यासाठी हॉटेलने मला बीएमडब्ल्यू गाडी दिली. खरं सांगायचं तर अशा व्हीआयपी ट्रीटमेंटचीची आम्हाला सवय नसते. आम्हाला आमच्या जिप्सीचीच सवय असते, आणि ती भावतेही.
दुसऱ्या दिवशी हॉटेल सोडताना मी बिलासाठी रिसेप्शनला माझे कार्ड दिले. “आपला मुक्काम कसा झाला?’ सिसेप्शनने विचारले? “छान.’ मी उत्तर दिले आणि बिल विचारले.
“आपला येथील मुक्काम हॉटेलने स्पॉन्सर केला आहे.’ रिसेप्शन म्हणाली, “आपण राष्ट्राचे संरक्षण करता, त्याबद्दल कृतज्ञतेची ही एक छोटीश्‍यी कृती आहे. वुई रिस्पेक्‍ट युवर पेट्रोनेज.’ प्रश्‍न बिलाच्या रकमेचा नाही, प्रश्‍न आहे त्यांनी लष्करी वर्दीला दिलेल्या आदराचा. सन्मानाचा…. या गोष्टीचा उल्लेख मी ताजहालच्या सीईओला पत्र पाठवून केला,. आणि आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे त्याने मला उत्तर पाठवले. ताज ग्रुप ने भारतातील सर्व हॉटेल्समध्ये लष्करी अधिकाऱ्याना डिस्काऊंट द्यायचा निर्णय घेतल्याचा त्यात उल्लेख होता. लष्कराला आदर आणि सन्मान देण्याची ही टाटाची रीत.
देशभरात म्हणूनच अंबानी-अदानीपेक्षा टाटांचे नाव आदराने घेतले जाते. केवळ देशात नाही, तर जगभरात. “टाटा हॅज बेस्ट वर्क्‍स एथिक्‍स.’ म्हणून म्हणायचे अरे हुजूर, वाह ताज (आणि टाटा) बोलिये…
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)