मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प आल्यामुळे जागतिक भौगोलिक आणि आर्थिक स्थितीबाबत अनेक अनिश्चितता निर्माण होणार आहेत. मात्र या अनिश्चिततांना टाळून वाटचाल करण्याऐवजी त्यामध्ये संधी शोधून आपल्याला पुढे जावे लागेल असे आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि तिची मित्र राष्ट्र चीनला वेगळे पाडण्यासाठी पुरवठा साखळीत बदल करणार आहेत. यात भारताला सहभागी होण्याची संधी आहे. अमेरिकेच्या आयफोन 25 टक्के उत्पादन एकट्या भारतातून होणार आहे. त्याचबरोबर भारतातील वाहन उद्योग जगाच्या तोडीचा झाला असून या क्षेत्रातही भारत आगेकूच करू शकेल असे कुमारमंगलम बिर्ला यांनी नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हटले आहे.
भारताचे बरेच औद्योगीकरण झाले आहे. मात्र जागतिक व्यासपीठावर याकडे पुरेशी लक्ष दिले गेलेले नाही असे सांगून बिर्ला यांनी म्हणाले की यासाठी भारताचा ब्रँड विकसित करावा लागेल. ते म्हणाले की भारतातील सिमेंट उद्योग हा जगातील दुसर्या क्रमांकाचा उद्योग आहे. भारतात पायाभूत सुविधा आणि घर बांधणी उद्योग वेगाने वाढत आहे. त्याच्या मुळात भारतातील सिमेंट उद्योगाचे यश आहे. याच आजारावर आपण विकसित भारताकडे आगेकूच करणार आहेत.
यामुळे आर्थिक विकास होण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. ते म्हणाले की, अमेरिकेतील सर्व सिमेंट कंपन्या वर्षाला जेवढे सिमेंट उत्पादन करतात त्याच्या दीडपट उत्पादन आदित्य बिर्ला उद्योग समूहातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी करते. युरोपातील सर्व देश मिळून जेवढे सिमेंट उत्पादन करतात त्याच्या 80 टक्के उत्पादन एकटी अल्ट्राटेक सिमेंट कंपनी करते. यावरून भारतातील सिमेंट उद्योग किती बलाढ्य आहे याची प्रचिती येते.
आता भारतातील सिमेंट, वाहन, मोबाईल उद्योगाबरोबरच इतर उद्योग जागतिक दर्जाचे होऊ शकतील. त्या दृष्टिकोनातून धडाडीने प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. जागतिक आर्थिक व्यासपीठावर अमेरिकेचा प्रभाव अजूनही कायम राहणार आहे असे सांगून ते म्हणाले की, आदित्य बिर्ला उद्योग समूहाने अमेरिकेत 15 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. आगामी काळातही अमेरिकेबरोबर काम करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे ते म्हणाले.