Arctic Open 2024 (Vantaa, Finland) : – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात अपयशी ठरलेले भारताचे स्टार खेळाडू पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन आजपासून (8 ते 13 ऑक्टोबर 2024) सुरू होणाऱ्या आर्क्टिक ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेतून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ऑलिम्पिकनंतर दोन्ही खेळाडूंनी आपल्या खेळामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यावर भर दिला होता. दरम्यान, सिंधूने भारताचे अनुप श्रीधर आणि कोरियन दिग्गज ली सेन इल यांना तिचे नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.
दुसरीकडे, सेनने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. या काळात त्यांनी आपला बहुतांश वेळ ऑस्ट्रियातील रेड बुल एरिनामध्ये घालवला. आर्क्टिक ओपनमध्ये सिंधूचा पहिला सामना कॅनडाच्या मिशेल लीशी होईल, तर ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाचा सामना गमावलेल्या सेनचा सामना डेन्मार्कच्या रॅस्मस गेमकेशी होईल. जर दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने पहिल्या अडथळ्यावर मात केली, तर पुढच्या फेरीत तिचा सामना 2022 ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन 18 वर्षीय जपानी खेळाडू टोमाको मियाझाकीशी होऊ शकतो, जिच्याकडून तिला या वर्षाच्या सुरुवातीला स्विस ओपनमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
लक्ष सेन 2023 मध्ये गेमकेकडून पराभूत झाला होता. त्यामुळे पराभवाची परतफेड करण्याची त्याच्याकडे चांगली संधी असणार आहे. हा सामना जिंकण्यात तो यशस्वी ठरला तर त्याचा पुढील सामना सातव्या मानांकित चायनीज तैपेईच्या चाऊ तिएन चेनशी होऊ शकतो. दुखापतीमुळे चार महिने मैदानाबाहेर राहिल्यानंतर मकाऊ ओपनमध्ये पुनरागमन करणारा किदाम्बी श्रीकांत आर्क्टिक ओपनमध्येही आपले आव्हान सादर करणार आहे. किरण जॉर्ज आणि सतीश कुमार करुणाकरन या देशबांधवांसह तो पात्रता फेरीतून आपली मोहीम सुरू ठेवणार आहे. पात्रता फेरीत माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या श्रीकांतचा सामना जॉर्जशी होईल, तर सतीशचा सामना फ्रान्सच्या अरनॉड मर्क्लेशी होईल.
China Open 2024 : गॉफने पटकावले विजेतेपद, अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी अमेरिकन खेळाडू….
सिंधू व्यतिरिक्त, फॉर्मात असलेल्या मालविका बनसोड आणि आकर्षी कश्यप हे देखील महिला एकेरीत आपले आव्हान सादर करतील. चायना ओपन सुपर 1000 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या मालविकाचा पहिल्या फेरीत चायनीज तैपेईच्या त्सुंग शूओ युनशी सामना होईल, तर अक्षरीचा सामना जर्मनीच्या यव्होन लीशी होईल. क्वालिफायरमध्ये भारताची आणखी एक खेळाडू उन्नती हुड्डा हिचा सामना इस्रायलच्या हेली निमनशी होणार आहे. पुरुष दुहेरीत कोणताही भारतीय सहभागी होत नाही पण रितुपर्णा पांडा आणि स्वेतपर्णा पांडा महिला दुहेरीत तर सतीश आणि आद्या वरियथ मिश्र दुहेरीत भाग घेतील.