भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार

पाक संसदेच्या अधिवेशनादरम्यान इम्रान खान यांची घोषणा

इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याच्या तावडीत सापडलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची उद्या सुटका केली जाणार आहे. शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका केली जाणार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज जाहीर केले.

दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहेत, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आज सकाळी म्हटले होते. त्यानंतर केवळ तासाभरातच पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्‍त अधिवेशनादरम्यान इम्रान खान यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्यात येणार असल्याची घोषणा केली.

पाकिस्तानच्या संसदेच्या संयुक्‍त अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेते शेहबाझ शरीफ यांनी बोलायला सुरुवात करताच इम्रान खान यांनी त्यांना मध्येच थांबवले आणि भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका केली जाईल, अशी घोषणा केली. पाक संसदेतील सदस्यांनी बाक वाजवून या घोषणेचे स्वागत केले.

तत्पूर्वी कुरेशी यांनीही तणाव कमी होण्यासाठी वैमानिक अभिनंदन यांना परत पाठवले जाण्याची ईच्छा व्यक्‍त केली होती.
भारताने पाकिस्तानच्या प्रभारी उच्चायुक्‍तांना पाचारण करून हवाई दलाच्या वैमानिकाला सुखरूप परत पाठवले जाण्याची मागणी केली होती. तसेच वैमानिकाला कोणतीही इजा पोहोचवली जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्‍त केली गेली होती, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगितले गेले. विंग कमांडर अभिनंदन यांचा जखमी अवस्थेतील व्हिडीओ पाकिस्तानने प्रसिद्ध केल्याने आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा आणि जिनिव्हा कराराचा भंग झाल्याचा आक्षेपही भारताने घेतला होता.

भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या पाकच्या लढाऊ विमानांना हुसकावून लावण्याच्या कारवाई दरम्यान भारताचे “मिग-21′ ताबा रेषेजवळ पाडण्यात आले होते आणि त्याच्या वैमानिकास पाक सैन्याने ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.