नवी दिल्ली – चीनच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देत भारतीय लष्कराने नववर्षानिमित्त गलवान खोऱ्यात भारताचा तिरंगा फडकवला. एएनआय या वृत्तसंस्थेने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दोन छायाचित्रे जारी केली आहेत. छायाचित्रांमध्ये लष्कराचे 30 जवान तिरंग्यासोबत दिसत आहेत. सैनिकांच्या हातात शस्त्रे असल्याचेही दिसते. एक तिरंगा भारतीय चौकीवर फडकत आहे तर दुसरा तिरंगा सैनिकांच्या हातात आहे.
चीनने याआधी एक व्हिडिओ देखील जारी केला होता, ज्यामध्ये ड्रॅगन सैनिक त्यांच्या गलवान भागात चीनचा ध्वज फडकावत राष्ट्रगीत गात असल्याचे दिसत होते. आता भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत दोन छायाचित्रे जारी केली आहेत. या छायाचित्रांमध्ये भारतीय सशस्त्र सैनिक पूर्ण उत्साहात दिसत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. चित्रांमधील सशस्त्र सैनिकांच्या हावभावांवरून हे स्पष्ट होते की ते कोणत्याही प्रकारची घुसखोरी खपवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. या छायाचित्रांमध्ये एकूण 30 सैनिक शस्त्रे घेऊन उभे आहेत.
व्हिडिओ जारी करून अपप्रचाराचा प्रयत्न –
काही दिवसांपूर्वी चीनच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून गलवानमध्ये चीनचा ध्वज फडकावल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये कॅप्शनसह लिहिले होते- ‘2022 च्या पहिल्या दिवशी गलवान व्हॅलीवर चीनचा ध्वज शानदारपणे फडकत आहे. हा ध्वज खास आहे कारण तो एकदा बीजिंगमधील तियानमेन स्क्वेअरवर फडकला होता.’ दरम्यान, चीनच्या व्हिडीओवर जेव्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले, तेव्हा भारतीय लष्कराने उत्तर दिले की, गलवान खोऱ्यात चीनने ज्या भागात ध्वज उभारला आणि फडकवला, तो भाग नेहमीच त्यांच्या ताब्यात आहे आणि या भागाबाबत कोणताही नवीन वाद नाही.