चीन सीमेवर भारतीय लष्कर करणार युद्धाभ्यास

पाच हजार जवानांसह वायुसेनेचा सहभाग
नवी दिल्ली: चीनच्या सीमेवर ऑक्‍टोबर महिन्यात भारतीय लष्कर आणि वायुसेना यांच्यातर्फे संयुक्‍त युद्धाभ्यास केला जाणार आहे. भारतीय सेनेच्या एकमेव “17 माउंटन स्ट्राइक कोर’चे पाच हजार जवान अरुणाचल प्रदेशात होणाऱ्या या युद्धाभ्यासात सहभागी होणार आहेत. चीनच्या सीमेवर भारतीय सेनेचा हा पहिलाच युद्धाभ्यास असणार आहे. या ठिकाणी युद्धजन्य परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी जवानांना तैनात केले जाणार आहे.

या युद्धाभ्यासासाठी वायुसेना पश्‍चिम बंगालमधील बगदोगरा येथून सैनिकांना एअरलिफ्ट करणार आहे. यासाठी वायुसेना सी-17 ग्लोबमास्टर, सी-130 जे सुपर हर्क्‍युलिस आणि एएन-32 या विमानांचा वापर करणार आहे. ज्यामुळे लवकरात लवकर युद्धक्षेत्राच्या ठिकाणी सैन्य तैनात करता येणार आहे. याशिवाय या युद्धाभ्यासात “17 माउंटन स्ट्राइक कोर’ च्या हॉवित्झर तोफांबरोबर रणगाडे आणि लष्कराच्या लढाऊ तुकड्यांचा शस्त्रसज्जतेसह समावेश असणार आहे. या युद्धाभ्यासाचे आयोजन चीनबरोबर पर्वतीय क्षेत्रात युद्धासाठी ’17 माउंटन स्ट्राइक कोर’ ला अधिक सक्षम बनवण्यासाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

या युद्धाभ्यासाची पाच ते सहा महिन्यांपासून ईस्टर्न कमांड अंतर्गत तयारी केली जात आहे. सेनेच्या सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार युद्धाभ्यासात तेजपूरमधील 4 कोर तुकड्यांना सेनेच्या रक्षणासाठी एका अतिउच्च ठिकाणी तैनात केले जाणार आहे. यामध्ये “17 माउंटन स्ट्राइक कोर’ च्या अडीच हजारपेक्षा जास्त जवानांना वायुसेना युद्धाभ्यासासाठी एअरलिफ्ट करणार आहे. या युद्धाभ्यासादरम्यान स्ट्राइक कोरचे जवान, 4 कोरच्या जवानांवर हवाई हल्ला करणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×