नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे ३३४ जणांचे पथक आज भारत आणि नेपाळ यांच्यातल्या बटालियन स्तरावरील सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी नेपाळला रवाना झाले. हा सराव नेपाळमध्ये सालझंडी इथे ३१ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत होणार आहे. दोन्ही देश आलटून पालटून दरवर्षी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करतात.
भारतीय लष्कराच्या पथकाचे नेतृत्व ११ गोरखा रायफल्स बटालियन करत आहे. नोपाळच्या लष्करी पथकाचे नेतृत्व श्रीजुंग बटालियनकडे आहे. जंगलातील युद्धकौशल्य, पर्वतीय प्रदेशातील दहशातवादविरोधी कारवाया आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार आपत्ती काळात मानवतेच्या दृष्टीकोनातून केली जाणारी मदत यामध्ये संयुक्त कार्यक्षमता बळकट करणे हे सूर्यकिरण सराव आयोजनाचे उद्दीष्ट आहे.
या सरावात कार्यसज्जता वाढविणे, वैमानिक प्रशिक्षण पैलू, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण रक्षण यावर भर दिला जाईल. या वेळी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या नेपाळ भेटीनंतर आणि नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्डेल यांच्या भारत दौऱ्यानंतर सूर्यकिरण सराव आयोजित करण्यात आला आहे.
या सरावामुळे भारत आणि नेपाळच्या जवानांना एकमेकांच्या कल्पना व अनुभव परस्परांना सांगता येतील, एकमेकांच्या चांगल्या गोष्टी शिकता येतील आणि एकमेकांची कार्यपद्धती चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. या संयुक्त लष्करी सरावामुळे समान संरक्षण उद्दीष्टे साध्य होतील आणि दोन्ही शेजारी देशांमधले द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यात मदत मिळेल.