नवी दिल्ली : भारतीय लष्करी संस्थांची महत्वपूर्ण माहिती पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्या हस्तकांना दिल्याच्या आरोपावरून संरक्षण दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. लष्करी गुप्तचर खाते आणि राजस्थान पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून हे हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त केले. यातील एका भारतीयाला आयएसआयची हस्तक असणाऱ्या पाकिस्तानी महिलेने आपल्या जाळ्यात ओढले होते, अशी माहिती पुढे येत आहे.
लखनौ येथील लष्करी गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे राजस्थान पोलिसांनी विकास कुमार (वय 29) याला अटक केली. तो श्रीगंगानगर येथील लष्कराच्या दारूगोळा कारखान्यात कार्यरत होता. तर लष्कराच्या महाजन फिल्ड फअयरींग रेंजमध्ये कंत्राटी कामगार असणारा चिमणलाल यालाही ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही आयएसआयसाठी काम करत अल्याचे आयएएनएस या वृत्तासंस्थेच्या बातमीत म्हटले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लष्करी गुप्तचरांना विकासकुमार हा आयएसआयला माहिती पुरवत असल्याची माहिती मिळाली होती. ती त्यांनी राजस्थान पोलिसांना दिली होती. या दोन्ही यंत्रणांनी या दोघांना जाळ्यात पकडण्यासाठी संयुक्तपणे ऑपरेशन डेझर्ट चेस राबवले. त्यात या दोघांवर 24 तास पाळत ठेवण्यात आली. त्यात हे दोघे पैशांच्या बदल्यात महत्वाची माहिती आयएसआयला देत असल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांना अटक करण्यात आली.
लष्करी संस्था, त्यांचे अधिकारी आणि दारूगोळ्याची सज्जता याबाबतची माहिती आयएसआयला दिल्याची कबुली कुमारने दिली आहे. याची छायाचित्रेही त्याने पाकिस्तानी हॅंडलरला पाठवली आहेत. चिमणलाल दारूगोळा कारखान्यातील पाणी वाटपाच्या रजिस्टरची छायाचित्रे जवळपास दररोज पाठवत असे. कुमारच्या स्वत:च्या आणि भावाच्या तीन अकाउंटस्वर पैसे जमा होत असत.
आयएसआयचा हनी ट्रॅप
मुलतान येथे वास्तव्यास असणाऱ्या महिला पाकिस्तानी गुप्तचराने फेसबुकच्या माध्यमातून कुमारला आपल्या जाळ्यात ओढले होते. तीने अनुष्का चोप्रा या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केले होते. गेल्या मार्चमध्ये तिच्याकडून कुमारला फ्रेंडस् रिक्वेस्ट आली होती. तेथे चॅटींग सुरू झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना आपला व्हॉटस् ऍप नंबर दिला होता. त्यावर ते व्हिडिओ कॉल करुन बोलत असत. त्यासाठी ती भारतीय क्रमांकाचा वापर करत असे. तीने लष्कराच्या कॅंटीनमध्ये कार्यरत आहोत असे सांगितले होते. तिने कुमारला लष्करी कर्मचाऱ्यांचे अनेक व्हॉटस् ऍप ग्रुप बनवायला सांगितले होते. त्या प्रत्येक ग्रुपमध्ये तीचा सहभाग होता.
तिने अमित कुमार नावाच्या व्यक्तीची ओळक तिचे वरीष्ठ अशी करून दिली. तोच कुमारचा हॅंडलर होता. तो पैशाच्या बदल्यात लष्करी माहिती पाठवण्यासाठी त्यानेच कुमारला राजी केले, असे सूत्रांनी सांगितले.