नवी दिल्ली – भारताची उदयोन्मुख महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वन्नम हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रजतपदक पटकावले. तिला खरेतर सुवर्णपदकाची संधी होती. मात्र, तिला कोलंबियाच्या जागतिक तिसऱ्या क्रमांकाच्या सारा लोपेझकडून कंपाऊंड प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीत पराभव पत्करावा लागला.
वैयक्तिक पुरुष कंपाऊंड प्रकारात, तीन वेळा विश्वचषक सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्मा जगातील अव्वल क्रमांकाचा नेदरलॅंड्सच्या माईक स्लोझरकडून उपांत्यपूर्व फेरीत 147-148 असा पराभूत झाला.
भारताच्या कंपाऊंड प्रकारातील तिरंदाजांना रजतपदकावरच समाधान मानावे लागले. रिकर्व्ह प्रकारातील पदकाच्या शर्यतीत अंकिता भकत ही एकमेव भारतीय तिरंदाज होती. नेदरलॅंड्सच्या डेन बॉश येथे 2019 सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्रॉंझपदक पटकावणाऱ्या ज्योतीने या स्पर्धेत सरस कामगिरी केली.
मात्र, तिला साराकडून 146-144 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. ज्योतीने यापूर्वी मेक्सिकोमध्ये 2017 साली झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रजत, तर 2019 साली डेन बॉश येथे झालेल्या स्पर्धेत ब्रॉंझपदक मिळवले होते. ही दोन्ही पदके तिने सांघिक स्पर्धांमध्ये मिळवली होती.