Grammy Awards 2025 : संगीत क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ग्रॅमी पुरस्कारांची घोषणा झाली आहे. लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो टाउन एरियामध्ये 67व्या ‘ग्रॅमी पुरस्कार 2025’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात बियॉन्से, लेडी गागा, ब्रून मार्स, शकीरासह अनेक प्रसिद्ध गायकांना पुरस्काराने गौरवण्यात आले. या सोहळ्यात भारतीय-अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी देखील छाप सोडली.
चंद्रिका टंडन यांनी ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज, अँबियंट किंवा चँट अल्बम’ श्रेणीमध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. चंद्रिका यांना हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेच्या बासरीवादक वॉटर केलरमन आणि जपानी व्हायोलिन वादक एरू मात्सुमोतो यांच्यासोबत मिळाला. या तिन्ही कलाकारांनी या अल्बमसाठी एकत्र काम केले आहे.
‘बेस्ट न्यू एज, अँबियंट किंवा चँट अल्बम’ या कॅटेगिरीत रिकी केज (ब्रेक ऑफ डॉन), रयुची सकामोटो (ओपस), अनुष्का शंकर (चॅप्टर II: हाउ डार्क इट इज बिफोर डॉन) आणि राधिका वेकारिया (वॉरियर्स ऑफ लाइट) यांनाही नामांकन मिळाले होते. मात्र, सर्वांना मागे टाकत चंद्रिका टंडन यांनी पुरस्कारावर नाव कोरले.
कोण आहेत चंद्रिका टंडन?
चंद्रिका टंडन या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या मोठी बहीण आहेत. त्या संगीतकार असण्यासोबतच, एक उद्योजक देखील आहेत. 2011 मध्ये त्यांना ‘सोल कॉल’ या अल्बमसाठी ‘बेस्ट कंटेम्पररी वर्ल्ड म्युझिक अल्बम’ श्रेणीत नामांकन मिळाले होते. चंद्रिका टंडन यांचे बालपण चेन्नईमध्ये गेले आहे. त्यांच्या आई देखील संगीतकार होत्या, तर वडील बँकर होते.
भारतात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना न्यूयॉर्कमधील मॅकिंझे अँड कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली. यानंतर 1992 मध्ये त्यांनी टंडन कॅपिटल असोसिएट्सची स्थापना केली. ‘त्रिवेणी’ हा त्यांचा सहावा अल्बम आहे.
ग्रॅमी पुरस्कार विजेते
- सर्वोत्कृष्ट अल्बम – काउब्वॉय कार्टर– बियॉन्से
- साँग ऑफ द इयर- नॉट लाईक अज् – केंड्रिक लामर
- बेस्ट रॅप अल्बम- अॅलिगेटर बाइट्स नेव्हर हिल
- बेस्ट पॉप व्होकल अल्बम- शॉर्ट अँड स्वीट – सबरीना कारपेंटर
- बेस्ट न्यू आर्टिस्ट- चॅपेली रोन