नवी दिल्ली – युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने पुढील महिन्यात ब्रिटनमध्ये होणाऱ्या बहुपक्षीय हवाई सराव कोब्रा वॉरियरमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोब्रा वॉरियर’ नावाचा हा हवाई सराव 6 ते 27 मार्च या कालावधीत ब्रिटनमधील वाडिंग्टन येथे होणार आहे.
भारताने तीन दिवसांपूर्वी या सरावात सहभागी होण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या काही दिवसांपूर्वी भारतीय हवाई दलाने या सरावासाठी पाच युद्ध विमाने पाठवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय हवाई दलाने या सरावातून माघार घेण्याचे कारण स्पष्टपणे सांगितले नसून, रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. हवाई दलाच्या या निर्णयाच्या काही तासांपूर्वी, युक्रेनवर रशियाच्या लष्करी हल्ल्याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावरील मतदानातही भारताने भाग घेतला नाही.
दरम्यान बुधवारी भारतीय हवाई दलाने पाच तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टच्या ताफ्यासह ‘कोब्रा वॉरियर’मध्ये सहभागी होण्याची घोषणा केली होती. भारतीय हवाई दलाने म्हटले होते की ‘कोब्रा वॉरियर 22’ या सरावाचे उद्दिष्ट ऑपरेशनल क्षमता प्रदान करणे आणि सहभागी हवाई दलांमध्ये सर्वोत्तम सराव सामायिक करणे आहे.