#AUSvIND T20I series : मालिकेत भारत तर, सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी

यजमानांनी व्हाइटवॉश टाळला, कोहलीची खेळी व्यर्थ

सिडनी –कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतरही भारतीय संघाला मंगळवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह यजमान संघाने सामना जिंकला तर, भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. 

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 20 षटकांत 7 बाद 174 असा रोखला गेला. कोहलीने एकहाती किल्ला लढवताना 61 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांचा हिरो ठरलेला हार्दिक पंड्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला व भारताला सामना गमवावा लागला. त्याने 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 20 धावा केल्या. स

लामीवीर लोकेश राहुल खातेही न उघडता डावातील दुसऱ्याच चेंडूवर बाद होत तंबूत परतला. शिखर धवनने सुरुवात तर चांगली केली मात्र, त्याचे मोठ्या खेळीत त्याला रूपांतर करता आले नाही. तो 21 चेंडूत 3 चौकारांसह 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतील स्टार खेळाडू संजू सॅमसन व श्रेयस अय्यर साफ अपयशी ठरले. भारताला अखेरच्या 24 चेंडूत 56 धावांची गरज होती. तेव्हा पंड्या व कोहली यांनी धावांचा वेग वाढवला. पण त्यातच पंड्या बाद झाला.

अखेरच्या दोन षटकांत भारताला 36 धावांची गरज होती, तेव्हा कोहली बाद झाला व तेव्हाच संघाचा पराभव स्पष्ट दिसू लागला. तळात शार्दुल ठाकूरने थोडी चमक दाखवली पण ही कामगिरी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही. ऑस्ट्रेलियाचा नवोदित लेग स्पीन गोलंदाज मिचेल स्वेपसन याने सर्वाधिक 3 गडी बाद केले. ऍण्ड्य्रू टाय, ग्लेन मॅक्‍सवेल, सिन अबॉट आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताविरुद्धच्या तिसऱ्या व अखेरच्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 186 धावा केल्या. वेडने 80 तर, मॅक्‍सवेलने 54 धावांची अफलातून खेळी केली.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

वेडची वादळी खेळी

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर 187 धावांचे आवाहन ठेवले. सलामीवीर वेडने 53 चेंडूत 80 धावांची अफलातून खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. वेडचे कारकिर्दीतील हे दुसरे अर्धशतक ठरले. पहिली अर्धशतकी खेळीही त्याने भारताविरुद्धच केली होती. वेडने टी-20 सामन्यांतील तीनही सर्वोच्च खेळी भारताविरुद्धच केल्या आहेत.

वेडने कर्णधार ऍरन फिंचच्या साथीत डावाची सुरुवात केली. मात्र, फिंचला भोपळाही फोडता आला नाही. वॉशिंग्टन सुंदरने त्याला बाद करत पहिला झटका दिला. त्यानंतर भरात असलेल्या स्टीव्ह स्मिथने वेडला सुरेख साथ देत संघाचा डाव सावरला. या जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. ही जोडी डोईजड होईल असे वाटत असतानाच सुंदरने स्मिथचा त्रिफळा उडवला व ही जोडी फोडली. स्मिथ 23 चेंडूत 24 धावा काढून बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या मॅक्‍सवेलने वेडसह वेगाने धावा जमवल्या.

दरम्यान, वेडने सलग दुसरे अर्धशतक झळकावताना 53 चेंडूत 80 धावांची खेळी केली. त्याने 7 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली. यजुवेंद्र चहलच्या चेंडूवर खरेतर मॅक्‍सवेल बाद झाला होता. मात्र, हा चेंडू नो बॉल होता त्यामुळे मॅक्‍सवेलला जीवनदान मिळाले. याचा लाभ घेत त्याने चौफेर टोलेबाजी केली. त्याने 3 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. 19 व्या षटकात शार्दुल ठाकूरने वेडला बाद केले. तर अखेरच्या षटकात टी.नटराजनने मॅक्‍सवेलचा त्रिफळा उडवला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने 2 गडी बाद केले. तर, टी. नटराजन व शार्दुल ठाकूरने प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया – 20 षटकांत 5 बाद 186 धावा. (मॅथ्यू वेड 80, ग्लेन मॅक्‍सवेल 54, स्टिव्ह स्मिथ 24, वॉशिंग्टन सुंदर 2-34, टी. नटराजन 1-33, शार्दुल ठाकूर 1-43). भारत – 20 षटकांत 7 बाद 174 धावा. (विराट कोहली 85, शिखऱ धवन 28, हार्दिक पंड्या 20, संजू सॅमसन 10, शार्दुल ठाकूर नाबाद 17, दीपक चहर नाबाद 0, मिचेल स्वेपसन 3-23, ग्लेन मॅक्‍सवेल 1-20, ऍडम झम्पा 1-21, ऍण्ड्य्रू टाय 1-31, सीन अबॉट 1-49).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.