कसोटी क्रिकेट : इंग्लंडचा दारुण पराभव, भारताची वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक

अहमदाबाद – अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांची फिरकी आणि ऋषभ पंत (101) शतक तर वॉशिंग्टन सुंदरच्या (96) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला डाव आणि २५ धावांनी पराभूत केलं. भारतीय संघाने चार सामन्यांची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. या विजयासह भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. ऋषभ पंत सामनावीर तर अश्विन मालिकावीर ठरला.

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजाला आजही सूर गवसला नाही. सावध सुरुवात करणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात पहिला धक्का अश्विनने दिला. झॅक क्राव्ली ५ धावा करून बाद झाला. त्यापाठोपाठ जॉनी बेअरस्ट्रो (0) आणि डॉम सिब्ले (3) तंबूत परतले. दरम्यान जो रुटने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील ३० धावा करून परतला. त्यानंतर डॅन लॉरेन्सने चिवट फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. मात्र अश्विनने त्याचा अडसर दूर करून भारताचा विजय सुकर केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात १३५ धावांत आटोपला. भारताकडून अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या.

तत्पूर्वी भारतीय संघाच्या पहिला डावाची सुरुवात अडखळत झाली होती. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने झंझावाती शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. त्याला वॉशिंग्टन सुंदरने साथ दिली. सुंदरने नाबाद ९६ धावा केल्या. भारताने पहिल्या डावात ३६५ धावांपर्यंत मजल मारून दीडशतकी आघाडी घेतली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.