#CWC19 : शमीची हॅट्ट्रिक अन् भारताचा रोमहर्षक विजय

मोहम्मद नबीची झुंज अपयशी

साउदॅम्पटन – क्षणाक्षणाला उत्कंठापूर्ण झालेल्या लढतीत मोहम्मद शमी याने स्पर्धेतील पहिली हॅट्ट्रिक नोंदविली, त्याच्या या कामगिरीमुळेच भारताने अफगाणिस्तानवर 11 धावांनी विजय मिळविला. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबी याने शैलीदार खेळ करीत दिलेली झुंज अपयशी ठरली. विजयासाठी भारताने 225 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

 

माफक आव्हान मिळालेल्या अफगाणिस्तानने दिलेली लढतच कौतुकास्पद होती. गुलाबदिन नईब (27), तहमत शाह (36), हशमतुल्ला शाहिदी (21) ब नजीबुल्ला झाद्रान (21) यांनी दमदार खेळ करीत संघाच्या विजयाच्या दिशेने नेले होते. एका बाजूने आत्मविश्‍वासाला जिद्दीची जोड देत नबी याने संघाचा विजय दृष्टीपथात आणलाही होता. नबी याने चार चौकार व एक षटकारसह 52 धावा केल्या. मात्र, शमी याचे शेवटचे शतक भारतासाठी निर्णायक ठरले. त्याने या षटकात नबी याच्यासह तीन गडी बाद करीत अफगाणिस्तानची विजयाची संधी हिरावून घेतली. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने 4, हार्दिक पांड्याने 2, जसप्रित बुमराहने 2 आणि युझवेंद्र चहलने 2 गडी बाद केले.

शमीची हॅट्ट्रिक

विजयासाठी अफगाणिस्तानला शेवटच्या षटकात 16 धावांची आवश्‍यकता होती. शमी याने 50 व्या षटकातील तिसऱ्या चेडूवर नवी याला बाद केले. हार्दिक पांड्या याने हा झेल घेतला. पाठोपाठ शमी याने अफताब आलम याचा त्रिफळा उडविला. पाचव्या चेंडूवर त्याने मुजीब उर रहमान याचीही तीच गत केली.

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. अन्य संघांच्या तुलनेत अफगाणिस्तान हा भारतासाठी कमकुबत प्रतिस्पर्धी मानला गेला होता. भारत किमान 300 धावांचे लक्ष्य ठेवणार अशी अपेक्षा होती. मात्र, अचूक टप्प्यावरील गोलंदाजीबाबत श्रीलंकेच्या गोलंदाजांकडून बोध घेत अफगाणिस्तानने प्रभावी मारा केला, त्यामुळेच त्यांना भारतीय संघास 8 बाद 224 धावांवर रोखता आले. कर्णधार विराट कोहली व केदार जाधव यांची दमदार अर्धशतके हेच भारताच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

पहिलाच विश्‍वचषक खेळणाऱ्या जाधव याने या स्पर्धेतील स्वत:चे पहिलेच अर्धशतक साजरे केले. त्याने तीन चौकार व एक षटकारासह 52 धावा केल्या. आक्रमक फटकेबाजीसाठी ख्यालनाम असलेल्या हार्दिक पांड्या याने सपशेल निराशा केली. तो केवळ 7 धावा काढून बाद झाला. याशिवाय भारताकडून फंलदाजीत के.एल.राहुल 30, विराट कोहली 67, विजय शंकर 29, महेंद्रसिंग धोनी याने 28 धावा केल्या.

अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद नाबी आणि गुल्बदिन नाएबने प्रत्येकी 2 गडी बाद केले. याशिवाय राशिद खान,रहमत शाह, आफताब आलम आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक :

भारत 50 षटकात 8 बाद 224 (के.एल. राहुल 30, विराट कोहली 67, विजय शंकर 29, महेंद्रसिंग धोनी 28, केदार जाधव 52, मोहम्मद नबी 2-33, गुलाबदिन नईब 2-51)

अफगाणिस्तान 49.5 षटकात सर्वबाद 213 (मोहम्मद नबी 52, तहमत शाह 36, गुलाबदिन नईब27, नजीबुल्ला झाद्रान 21, मोहम्मद शमी 4-40, हार्दिक पांड्या 2-51, जसप्रित बुमराह 2-39, युझवेंद्र चहल 2-36)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)