नवी दिल्ली – भारतातील वाहन उद्योग वेगाने वाढत आहे. त्यामुळे पुढील वर पाच वर्षात भारतीय वाहन उद्योग हा जगातील पहिल्या क्रमांकाचा वाहन उद्योग होईल, याबद्दल आपल्याला खात्री आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
हा उद्योग भारतात गेल्या दहा वर्षात झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे या क्षेत्रात 4.5 कोटी रोजगार निर्माण झाले आहे. वाहनाच्या संशोधन आणि विकासाबरोबरच निर्मिती आणि वितरण क्षेत्रातही भारत जगाच्या पुढे जाणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी वितरकांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल असोसिएशन या संघटनेच्या सदस्या समोर बोलतांना दिली.
वाहन कंपन्यांबरोबरच भारतातील वाहन वितरकही या क्षेत्रात आपले योगदान देत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भारतातील वाहन उद्योग सध्या तब्बल 22 लाख कोटी रुपयांचा आहे. पुढील पाच वर्षे तो याच वेगाने वाढणार आहे. त्यामुळे जगातील इतर सर्व देश भारताच्या मागे राहणार आहेत.
वाहन उद्योग इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा सर्वात जास्त जीएसटी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करता येत आहे. भारतातील वाहन उद्योग केवळ देशातील गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन करत नाही. भारतात जेवढ्या मोटरसायकल तयार होतात त्यातील निम्म्या मोटरसायकल परदेशात विकल्या जातात असे त्यांनी सांगितले.
सध्या अमेरिका सर्वात पुढे
सध्या अमेरिकेतील वाहन उद्योग 78 लाख कोटी रुपयांचा आहे. तर चीनमधील वाहन उद्योग 47 लाख कोटी रुपयाचा आहे. पुढील पाच वर्षात भारत चीनला आणि अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाचा देश होणार आहे असे ते म्हणाले. ते म्हणाले की, 2014 मध्ये भारताचा वाहन उद्योग केवळ 7.5 लाख कोटी रुपयांचा होता. दहा वर्षांमध्ये हा उद्योग तीन पटीने वाढून 22 लाख कोटी रुपयांचा झाला आहे.