Rahul Gandhi on RSS | शिक्षण व्यवस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हातात गेली तर देश उद्ध्वस्त होईल, अशी जोरदार टीका काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. जंतरमंतर येथे राष्ट्रीय शिक्षण धोरणा (NEP) 2020, यूजीसी मसुदा आणि पेपर लीक विरोधात इंडिया आघाडीच्या विद्यार्थी संघटनेकडून निदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी आरएसएसवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, जर आरएसएसच्या हातात आपली शिक्षण व्यवस्था गेली तर हा देश उद्ध्वस्त होईल. या देशात कोणालाही रोजगार मिळणार नाही. आज विद्यापीठांचे कुलगुरू हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नामांकित केले जातात. येणाऱ्या काळात सर्वच राज्य विद्यापीठाचे कुलगुरूंची निवड देखील त्यांच्याच नामांकनातून होईल.
देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान कुंभमेळ्याबद्दल बोलले. मी त्यांना सांगू इच्छितो की कुंभमेळ्याबद्दल बोलणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी भविष्याबद्दलही बोलले पाहिजे. त्यांनी बेरोजगारीबद्दल बोलले पाहिजे. भाजप-आरएसएस मॉडेलचे उद्दिष्ट देशातील सर्व संपत्ती अंबानी-अदानींना देणे व सर्व संस्था-संघटना आरएसएसला सोपवणे हे आहे, अशा शब्दात त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
पंतप्रधान महागाई आणि बेरोजगारीबद्दल एकही शब्द बोलत नाहीत. तुम्ही विद्यार्थी आहात. आपल्या धोरण आणि विचारधारेत फरक असू शकतो, मात्र भारताच्या शिक्षण व्यवस्थेशी कधीही तडजोड करणार नाही. आपण एकत्र पुढे जाऊ व आरएसएस आणि भाजपला पराभूत करू, असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले.