चमक दाखविण्यासाठी गेलवर दडपण
भारत वि. वेस्टइंडिज
स्थळ-पोर्ट ऑफ स्पेन
वेळ- सायंकाळी 7 वा. (भारतीय वेळेनुसार)
पोर्ट ऑफ स्पेन – विश्वचषक स्पर्धेत भारताला मधल्या फळीतील खेळाडूंच्या कामगिरीची समस्येने ग्रासले होते. वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात या समस्येवर भारत कशी मात करतो हीच उत्सुकता निर्माण झाली आहे. कसोटी सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या विंडीजच्या संघात स्थान न मिळालेला ख्रिस गेलवर निवृत्त होण्यापूर्वी शानदार कामगिरी करण्याचे दडपण राहणार आहे.
या दोन संघांमधील पहिला “वन-डे’ सामना पावसामुळे स्थगित करावा लागला होता. त्याआधी झालेल्या टी-20 च्या मालिकेत भारताने तीनही सामने जिंकून वर्चस्व गाजविले होते. तिसऱ्या लढतीत ऋषभ पंतने मधल्या फळीत शैलीदार खेळ करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. मधल्या फळीत चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचे नाव घेतले जात आहे.
टी-20 सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. त्याला संधी मिळाली तर लोकेश राहुलला विश्रांती द्यावी लागणार आहे. या मालिकेसाठी संघात स्थान मिळालेल्या केदार जाधवला संधी मिळाली तर त्याला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेतील एका अर्धशतकाचा अपवाद वगळता त्याला अपेक्षेइतके यश मिळालेले नाही.
या स्पर्धेतील अपयशानंतर दिनेश कार्तिकला संघातून अर्धचंद्र देण्यात आला आहे. त्यामुळेच जाधववर टांगती तलवार राहणार आहे. जाधव हा पर्यायी फिरकी गोलंदाज असला तरी संघात कुलदीप यादव व रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकी गोलंदाजांचा समावेश असल्यामुळे जाधवला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वरकुमारला जर विश्रांतीची गरज असेल तर त्याच्याऐवजी नवदीप सैनीला पाचारण केले जाईल. पहिल्या सामन्यात निराशा करणाऱ्या खलीद अहमदला वगळले जाण्याची शक्यता असून त्याच्या युझवेंद्र चहलचा समावेश केला जाईल.
गेलने पहिल्या सामन्यात 4 धावा करण्यासाठी 31 चेंडूंची मदत घेतली होती. त्यामुळेच त्याला कसोटी संघाबाबत विचार करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतून लबकरच तो निवृत्त होणार आहे. खरंतर त्याला स्वत:च्या मैदानावर होणाऱ्या कसोटीद्वारे रामराम करण्याची इच्छा होती. मात्र त्याच्या खेळात आलेल्या मर्यादा लक्षात घेतच त्याच्या जागी युवा खेळाडूला प्राधान्य मिळाले आहे. उर्वरीत दोन्ही वन-डे मध्ये नावलौकिकास साजेसा खेळ करीत यशस्वी सांगता करण्यासाठी त्याच्यावर दडपण असेल. पहिला सामना त्याचेच प्रतिक होता. फलंदाजीत त्याच्याबरोबरच एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन, शिमोरन हेटमेयर यांच्याकडून त्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस, कार्लोस ब्रेथवेट यांच्यावर त्यांची भिस्त आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, निकोलस पूरन, शिमोरन हेटमेयर, रोस्टोन चेस, फॅबियन ऍलन, कार्लोस ब्रेथवेट, किमो पॉल, शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस, केमार रोच.