यशस्वी सांगता करण्यासाठी विंडीज उत्सुक
स्थळ-प्रॉव्हिडन्स, गयाना
वेळ-(भारतीय वेळेनुसार) रात्री 8 वा.
गयाना – वेस्ट इंडिजविरूद्ध पहिले दोन सामने जिंकून विजयी आघाडी घेणाऱ्या भारताचे लक्ष्य निर्विवाद वर्चस्वाचे. त्यादृष्टीनेच ते आज येथे होणाऱ्या टी-20 च्या तिसऱ्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. अर्थात आजच्या सामन्यात ते काही प्रयोग करण्याची शक्यता आहे.
भारताला या मालिकेतील पहिल्या लढतीत विजयासाठी संघर्ष करावा लागला होता या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील अपयश पुन्हा दिसून आले होते. दुसरा सामना त्यांनी 22 धावांनी जिंकला होता. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. मात्र भारताने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यामुळे आजच्या लढतीत त्यांना अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत फारसे बदल होण्याची शक्यता कमी आहे.
दुसरा सामना झाल्यानंतर कोहलीने सांगितले की, विजयी आघाडी घेतल्यामुळे काही प्रयोग करण्याचे आम्हाला संधी आहे. तरी आगामी एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेचा विचार करता आम्हाला आजची लढतही जिंकणे महत्त्वाचे आहे.
महेंद्रसिंग धोनीचा वारसदार समजला जाणारा ऋषभ पंतने पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे 4 व 0 धावा केल्या होत्या. त्यामुळेच त्याच्याऐवजी लोकेश राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुल हा स्थानिक सामन्यांमध्ये यष्टीरक्षण करीत असल्यामुळे त्याच्या या शैलीची चाचपणी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र कोहली हा पंतला आणखी एक संधी देण्यासाठी उत्सुक आहे. रोहित शर्मा व कोहली यांना विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. नवदीप सैनी व रवींद्र जडेजा यांना विश्रांती देत त्यांच्याजागी राहुल व दीपक चहार बंधुंचा समावेश होईल अशी चर्चा आहे.
तिसरा सामना जिंकून या मालिकेची गोड सांगता करण्यासाठी वेस्ट इंडिज कसोशीने प्रयत्न करील असा अंदाज आहे. विशेषत: एक दिवसीय मालिकेसाठी त्यांना हा विजय आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच त्यांच्या फलंदाजांना चांगले कौशल्य दाखवावे लागणार आहे. गोलंदाजीत सुनील नरेन, शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस यांच्यावर त्यांची भिस्त आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहार, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, दीपक चहार, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज – कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शिमरोन हेटमेयर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, रोवमन पॉवेल, किमो पॉल, सुनील नरेन, शेल्डॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस, अँथोनी ब्रॅम्बेल, जेसन मोहम्मद, खॅरी पिअरी.