स्थळ- लॉडरहिल, फ्लोरिडा
वेळ-रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)
लॉडरहिल, (फ्लोरिडा) – विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघास आज येथे वेस्ट इंडिजच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या दोन संघांमधील पहिला टी-20 सामना येथे होणार असून भारताच्या सांघिक कौशल्याचीही आज चाचणी ठरणार आहे.
विश्वचषक स्पर्धेत भारतास बाद फेरीत न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यासह या स्पर्धेतील सर्वच लढतींमध्ये भारताच्या मधल्या फळीतील अपयश प्रकर्षाने दिसून आले होते. येथे हा कमकुवतपणा भारतीय संघ दूर करणार काय याची उत्कंठा आहे. मधल्या फळीतील श्रेयस अय्यर व मनीष पांडे यांच्यावर त्यादृष्टीने मोठी जबाबदारी आहे.
विश्वचषक स्पर्धेत पांडे याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपले नाणे खणखणीत करण्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा आहेत. पांडे व अय्यर या दोन्ही खेळाडूंनी वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्ध झालेल्या मालिकेत भारत “अ’ संघास विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
विश्वचषक स्पर्धा सुरू असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यात फक्त कसोटी सामनेच खेळण्याचे ठरविले होते. मात्र त्याने या दौऱ्यात मर्यादित षटकांच्या सामन्यातही भाग घेण्याचे ठरविल्यानंतर त्याच्याकडेच कर्णधारपदाची सूत्रे कायम राहिली आहेत. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला या दौऱ्यात संघात विश्रांती देण्यात आली आहे तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा मर्यादित षटकांच्या सामन्यात सहभागी होणार नसून तो कसोटी सामनेच खेळणार आहे.
अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज खलील अहमद, दीपक चहार यांनी भारताच्या संघात पुनरागमन केले आहे तर नवदीप सैनी व दीपक चहारचा भाऊ राहुल यांना पदार्पणाची संधी मिळणार आहे. तंदुरुस्त झालेला शिखर धवन हा रोहित शर्माच्या साथीत डावाची सुरूवात करणार आहे. चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुल याला पाठविले जाण्याची शक्यता आहे. रोहितने विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याने पाच शतके करीत विश्वविक्रम केला होता. राहुलनेही या स्पर्धेत सलामीस खेळताना एक शतक ठोकले होते. महेंद्रसिंग धोनीच्या जागी ऋषभ पंत याला आपली निवड सार्थ करण्याची संधी आहे.
कार्लोस ब्रेथवेट या अष्टपैलू खेळाडूकडे वेस्ट इंडिजच्या कर्णधारपदाची धुरा पुन्हा सोपविण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन व कायरन पोलार्डच्या समावेशामुळे त्यांचा संघ बलवान झाला आहे. कोणत्याही स्थानावर आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे तसेच आयपीएलमधील सहभागामुळे भारतीय फलंदाजांच्या गुणदोषांचा त्याला बारकाईने अभ्यास आहे. फलंदाजीत एविन लेविस, शिमरन हेटमेयर, निकोलस पूरन, जॉन कॅम्पबेल यांच्यावरही त्यांची भिस्त आहे. गोलंदाजीत शेल्डॉन कॉट्रेल, ऍन्थोनी ब्रॅम्बेल, खॅरी पिअरी यांच्याकडून प्रभावी कामगिरी अपेक्षित आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
वेस्ट इंडिज- कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, एविन लेविस, शिमरन हेटमेयर, निकोलस पूरन, कायरन पोलार्ड, रॉवमन पॉवेल, किमो पॉल, सुनील नरेन, शेल्ड्रॉन कॉट्रेल, ओशानी थॉमस, ऍन्थोनी ब्रॅम्बेल, आंद्रे रसेल, खॅरी पिअरी.
भारत- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहार, भुवनेश्वरकुमार, खलील अहमद, दीपक चहार, नवदीप सैनी.