#CWC19 : भारतीय संघाला लंकादहनाची संधी

शेवट गोड करण्यासाठी श्रीलंका उत्सुक

स्थळ-हेडिंग्ले, लीड्‌स
वेळ-दु.3 वाजता.

लीड्‌स – मधल्या फळीतील फलंदाजीचे कोडे सोडण्यासाठी भारताकरिता श्रीलंकेविरूद्ध आज येथे होणारा अखेरचा साखळी सामना आगामी उपांत्य लढतीपूर्वीची रंगीत तालीम असणार आहे. स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा लंकेकडून प्रयत्न होईल अशी अपेक्षा आहे.

भारताने साखळी गटात दुसरे स्थान घेत यापूर्वीच उपांत्य फेरी गाठली आहे. आजचा सामना जिंकून आघाडीस्थान घेण्याची त्यांना संधी आहे. बाद फेरीत स्थान मिळविले असले तरी भारतीय संघापुढे अद्यापही काही समस्या त्यांना वाकुल्या दाखवित आहेत. मधल्या फळीत खात्रीलायक कामगिरी करू शकणारा फलंदाज त्यांना सापडला नाही. सध्या तरी ऋषभ पंत यालाच चौथ्या क्रमांकावर पाठविले जाणार हे निश्‍चित आहे.

बांगलादेशविरूद्ध त्याचे अर्धशतक थोडक्‍यात हुकले होते. महेंद्रसिंग धोनी याच्याकडून अपेक्षेइतका आक्रमक खेळ होत नाही ही समस्या म्हणजे अवघड जागी दुखणे व जावई डॉक्‍टर अशीच आहे. कदाचित त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवित पंत व हार्दिक पांड्या यांना त्यांचा नैसर्गिक खेळ करण्यास वाव द्यायचा अशीही रणनीती कर्णधार विराट कोहलीकडून केली जाण्याची शक्‍यता आहे.

जखमी विजय शंकर याच्या बदली पाचारण करण्यात आलेला मयंक अग्रवाल हा येथे दाखल झाला आहे. मात्र, त्याला संधी मिळण्याबाबत साशंकताच आहे. त्याचा मित्र लोकेश राहुल याने सलामीत आपली उपयुक्तता यापूर्वीच सिद्ध केली आहे. रोहित शर्मा याने आतापर्यंत या स्पर्धेत 4 शतकांसह 544 धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत द्विशतक करावे अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे.

गोलंदाजीत जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांनी अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. खरतर बुमराहला विश्रांतीची गरज आहे. तथापि साखळी गटातील अव्वल स्थान खुणावत असल्यामुळेच त्याला विश्रांती देण्याबाबत तो उत्सुक नाही. आतापर्यंत संधी न मिळालेला रवींद्र जडेजा याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

भारतीय फलंदाजांना आयपीएलमुळे सवयीचा झालेला लसिथ मलिंगा हा लंकेच्या गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असणार आहे. धनंजय डीसिल्व्हाने या स्पर्धेत आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी केली आहे. धोनीला मलिंगाच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्यात अडचणी येत नाहीत मात्र, फिरकी गोलंदाजांपुढे खेळताना त्याला अडचणी येत आहेत हे लक्षात घेऊनच लंकेकडून डावखुरा फिरकी गोलंदाज मिलिंदा सिरीवर्धने याला संधी मिळेल असा अंदाज आहे. कुशल परेरा,अविष्का फर्नांडो,कुशल मेंडिस, जीवन मेंडिस यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची भिस्त आहे. प्रौढ खेळाडू अँजेलो मॅथ्युज याचा हा अखेरचा विश्‍वचषक सामना असण्याची शक्‍यता आहे. निवृत्त होण्यापूर्वी चमकदार खेळ करण्यासाठी त्याच्याकडून अपेक्षा आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मयंक अग्रवाल.

श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.

Leave A Reply

Your email address will not be published.