India vs Sri Lanka ODI Series : श्रीलंका दौऱ्यासाठी भारताने एकदिवसीय आणि टी-20 संघाची घोषणा केली आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनताच टीम इंडियामध्ये अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. श्रीलंका दौरा ही गंभीरची पहिली परिक्षा असेल. या दौऱ्यासह टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला सुरुवात करणार आहे. भारताच्या वनडे संघात नवीन चेहऱ्यांचा प्रवेश झाला आहे. रियान पराग आणि हर्षित राणा यांना संधी मिळाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा टीम इंडियाचा भाग आहेत तर रोहित वनडे संघाच्या कर्णधारपदी कायम आहे.
टीम इंडियात शुभमन गिलचा दर्जा वाढला आहे. टी-20 सोबतच त्याला एकदिवसीय संघाचाही उपकर्णधार बनवण्यात आला आहे. तर हार्दिक पांड्यासोबत संघात स्थानाशिवाय काहीही विशेष घडले नाही . भारताने वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, हर्षित राणा आणि खलील अहमद यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. टीम इंडियाला पंड्याचा बॅकअप म्हणून शिवम दुबेला तयार करायचे आहे. त्यामुळे दुबेचा वनडे सोबतच टी-20 मध्येही समावेश करण्यात आला आहे.
टीम इंडियात नव्या चेहऱ्यांचा समावेश..
रियनने नुकतेच भारताकडून टी-20 मध्ये पदार्पण केले. आता तो एकदिवसीय संघाचाही एक भाग आहे. हर्षित राणाबद्दल बोलायचे तर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हर्षित आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. तो गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. राणा आता भारताच्या एकदिवसीय संघाचा देखील भाग बनला आहे.
अय्यर-राहुलचे वनडे संघात पुनरागमन..
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल बराच काळ भारतीय संघाबाहेर होते. पण आता दोघांना वनडे संघात स्थान मिळाले आहे. अय्यरने नुकतेच केकेआरला आयपीएलचे जेतेपद पटकावण्यास मदत केली होती. त्याचबरोबर केएल राहुलने आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे.
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग , रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.