जोहान्सबर्ग – पालघर एक्सप्रेस शार्दुल ठाकूरने केलेल्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावांवर रोखला. भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या. यजमान संघाने 27 धावांची निसटती आघाडी घेतली होती. मात्र, या सामन्यावर भारतीय संघाचे पकड घेण्याचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात मंगळवारी 2 गडी गमावून 85 धावा केल्या असून आता त्यांच्याकडे 58 धावांची आघाडी आहे.
भारताचा पहिला डाव 202 धावांवर संपूष्टात आणताना दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्यानंतर किगन पीटरसन व टेंबा बवुमा यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला निसटती आघाडी मिळवून दिली. पीटरसनने 62 तर, बवुमाने 51 धावा केल्या. त्यांना साथ देताना डीन एल्गरने 28, केल वर्नेन व मार्को जेन्सन यांनी प्रत्येकी 21 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिका मोठी आघाडी घेणार असे चित्र दिसत होते. मात्र, कर्णधार लोकेश राहुलने चेंडू शार्दुलकडे सोपवण्याचा घेतलेला निर्णय सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
शार्दुलने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना 7 गडी बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची वाताहत केली. त्याला साथ देताना महंमद शमीने 2 तर, जसप्रीत बुमराहने 1 गडी बाद केला.
27 धावांच्या पिछाडीनंतर भारताने आपला दुसरा डाव सुरु केला. सलामीवीर कर्णधार लोकेश राहूल केवळ 8 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मयंक आग्रवालही स्थिरावलेला असताना 23 धावांवर बाद झाला. यावेळी संघाची अवस्था 2 बाद 44 अशी बिकट बनली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून अपयशी ठरत असलेल्या चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी मात्र, संयम दाखवला व दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेला आणखी यश मिळू दिले नाही. खेळ थांबला तेव्हा पुजारा 35 तर रहाणे 11 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सन व ड्युन ऑलिव्हर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 202. दक्षिण आफ्रिका पहिला डाव – 79.4 षटकांत सर्वबाद 229 धावा. (किगन पीटरसन 62, टेंबा बवुमा 51, डीन एल्गर 28, केल वर्नेन 21, मार्को जेन्सन 21, शार्दुल ठाकूर 7-61, महंमद शमी 2-52, जसप्रीत बुमराह 1-49). भारत दुसरा डाव – 20 षटकांत 2 बाद 85 धावा. (मयंक आग्रवाल 23, चेतेश्वर पुजारा खेळत आहे 35, अजिंक्य रहाणे खेळत आहे 11, मार्को जेन्सन 1-18, ड्युन ऑलिव्हर 1-22).