#ICCWorldCup2019 : पारंपरिक लढतीत भारताचे पाकिस्तानविरूध्द पारडे जड

#INDvPAK – पाकिस्तानकडून चिवट झुंज अपेक्षित : आजही पावसाचे सावट

मॅंचेस्टर – भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढत एखाद्या धर्मयुध्दासारखीच खेळली जाते. अंतिम सामन्यापेक्षाही या लढतीबाबत कमानीची उत्कंठा असते. आज येथे होणाऱ्या विश्‍वचषक स्पर्धेतील सामनाही त्यास अपवाद नाही. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. तरीही ईर्षेने खेळणाऱ्या पाकिस्तानकडून शर्थीची झुंज अपेक्षित आहे. आजच्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे.

या स्पर्धेत भारताने विजेतेपदाचे दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियावर सनसनाटी मात केली आहे. या विजयाचा शिल्पकार असलेला शिखर धवन याची अनुपस्थिती भारतास जाणवणार असली तरी कांगारुंवरील विजयामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. धवनच्या जागी सलामीची जबाबदारी के.एल. राहुल याच्यावर सोपविण्यात आली आहे. मोहम्मद आमीर व वहाब रियाझ यांना कसे सामोरे जातो हीच उत्सुकता आहे. न्यूझीलंडविरूध्दचा पावसाने धुतल्यामुळे राहुल तसेच चौथ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज यांच्या कौशल्याची चाचणी झाली नाही.

भारताच्या फलंदाजीची मुख्य मदार रोहित शर्मा, कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दीक पांड्या यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे धवनच्या जागी अंतिम अकरा खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिक व विजय शंकर यांच्यापैकी स्थान मिळविणाऱ्या खेळाडूवरही मधल्या फळीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार यांच्यावर मोठी जबाबदारी आहे.

पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा असला तरी त्यांनी दिलेली झुंज कौतुकास्पद होती. वहाब रियाझ, हसन अली यांनी संघाचा विजय दृष्टीपथात आणला होता.ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने विजयश्री खेचून आणली अन्यथा आणखी एक अनपेक्षित निकाल नोंदविला गेला असता. आज त्यांच्या कर्णधार सर्फराझ अहमद, बाबर आझम, शोएब मलीक, इमाम उल हक यांच्यावरही फलंदाजीची भिस्त आहे. मोहम्मद आमीर व वहाब रियाझ ही त्यांची गोलंदाजीतील प्रमुख अस्त्रे आहेत.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

पाकिस्तान – सर्फराझ अहमद (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, आसिफ अली, फखर झमान, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाद वासिम, इमाम उल हक, मोहम्मद आमीर, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, शदाब खान, शाहीन आफ्रिदी, शोएब मलिक, वहाब रियाझ.

Leave A Reply

Your email address will not be published.