#INDvENG 2nd ODI : भारतीय फलंदाजांनी इंग्लंडला झोडपले

इंग्लंडसमोर विजयासाठी 337 धावांचे आव्हान

पुणे – लोकेश राहुलचे दमदार शतक व कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 6 गडी गमावून 336 धावांचा डोंगर उभा केला.

नियमित कर्णधार इयान मॉर्गन दुखापतीमुळे खेळू शकला नसल्याने जोस बटलर संघाचे नेतृत्व करत होता. त्याने नाणेफेक जिंकूनही भारताला प्रथम फलंदाजी दिली. त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सामन्यातील शतकवीर शिखर धवन व हिटमॅन रोहित शर्मा यांना लवकर बाद करण्यात यश मिळवले. रोहित शर्माने 25(25) आणि शिखर धवनने 4(17)  धावांची खेळी केली.

मात्र, त्यानंतर कोहलीने राहुलच्या साथीत संघाचा डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 121 धावांची बहुमोल भागीदारी केली व संघाला शतकी धावसंख्या गाठून दिली. कोहली चांगला खेळत असताना पुन्हा एकदा आदील रशिदच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक बटलरकडे झेल देत बाद झाला. त्याने 79 चेंडूत 3 चौकार व 1 षटकारांच्या मदतीने 66 धावा केल्या.

तो बाद झाल्यावर आलेल्या पंतने राहुलला सुरेख साथ देत वादळी फलंदाजी केली. दरम्यान राहुलनेही अर्धशतक पूर्ण केले व शतकाकडे कूच केले. त्याने एकदिवसीय सामन्यांतील पाचव्या शतकाला गवसणी घालताना 114 चेंडूत 7 चौकार व 2 षटकार फटकावताना 108 धावांची खेळी केली. मात्र, त्यानंतर आक्रमक फटका खेळताना तो बाद झाला. त्याने पंतसह चौथ्या गड्यासाठी 113 धावांची भागादारी केली.

राहुल बाद झाल्यानंतर पंतनेही धडाक्‍यात अर्धशतक साकार केले. त्याने हार्दिक पंड्यासह त्यानंतर तो शतक फटकावेल असे वाटत असतानाच पंचांच्या सॉफ्ट सिग्नलचा बळी ठरला. त्याने 40 चेंडूत 3 चौकार व 7 षटकारांची आतषबाजी करत 77 धावा केल्या. पंत बाद झाल्यावर हार्दिकला साथ देण्यासाठी त्याचा भाऊ कृणाल खेळपट्टीवर आला. त्यावेळी हार्दिकने गिअर बदलला व वेगाने धावा केल्या. तो 16 चेंडूत 1 चौकार व 4 षटकारांसह 35 धावांची खेळी केली व संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली.  पंतने 7 तर पंड्याने 4 षटकार ठोकून गहुंजे मैदान दणाणून सोडलं. दोघांनी मिळून 11 षटकार ठोकले. कृणाल 12 धावांवर तर, शार्दुल ठाकूर 0 धावांवर नाबाद राहिले.

इंग्लंडकडून रॅकी टाॅप्ली व टॉम कुरेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सॅम कुरेन व आदील रशिद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर मोईल अली आणि  बेन स्टोक्स यांना गडी बाद करण्यात अपयश आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.