भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना आज नागपूरमध्ये पार पडला. हा सामना टफ होईल असे वाटत होते मात्र हा सामना एकतर्फी झाल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडिया ४ विकेट्सने इंग्लंडवर विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २४८ धावा केल्या होत्या, विजयाचे लक्ष्य भारताने 38.3 ओव्हरमध्ये पार केले. विशेष बाब म्हणजे या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना फॉर्म गवसला.
श्रेयस अय्यरने 30 चेंडूत अर्धशतकी खेळी पूर्ण केली. श्रेयस अय्यर 36 चेंडूत 59 धावा करून बाद झाला. भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक ८७ धावा केल्या. श्रेयसच्या जागी बढती म्हणून अक्षर पटेल मैदानावर आला.त्याने गिलसोबत शतकी भागिदारी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मात्र टीमला विजय मिळण्याआधी तो बाद झाला. अक्षरने 47 चेंडूत 52 धावा केल्या. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा पुन्हा फेल झाला. मात्र शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल यांना सूर गवसल्याने टीममध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. यानंतर आता दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ अजिंक्य आघाडी मिळविण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना 9 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळवला जाणार आहे.