#CWC19 : भारताची बांगलादेशविरूद्ध आज कसोटी

– जाधव व चहल यांना वगळणार?
– भुवनेश्‍वर व जडेजाला संधी

बर्मिंगहॅम – इंग्लंडविरूद्ध पराभव झाल्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान बळकट करण्यासाठी भारताची बांगलादेशविरूद्ध आज कसोटी ठरणार आहे. या दृष्टीनेच भारतीय संघात केदार जाधव व युझवेंद्र चहल यांच्या जागी रवींद्र जडेजा व भुवनेश्‍वर यांना संधी दिली जाणार नाही.

स्थळ- एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
वेळ-दु. 3 वाजता.

जाधव याने या स्पर्धेत एक अर्धशतक झळकाविले असले तरी त्याला गोलंदाजीत फारसे यश मिळालेले नाही. महत्त्वपूर्ण असलेल्या लढतीत त्याच्या तुलनेत जडेजा याचा अनुभव जास्त उपयुक्त ठरणार आहेच. आपण अव्वल दर्जाचे क्षेत्ररक्षक असल्याचे जडेजा याने इंग्लंडविरूद्ध सिद्ध केले आहे. तो प्रभावी गोलंदाज आहे व झंझावती फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे असल्यामुळेच भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री त्याला संधी देण्याकरिता अनुकुल आहेत.

चहल याच्या गोलंदाजीचा इंग्लंडच्या फलंदाजांनी खरपूस समाचार घेतला होता. भुवनेश्‍वर हा पूर्णपणे तंदुरूस्त झाल्यामुळे वेगवान गोलंदाजाची बाजू बळकट झाली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचे फलंदाज फिरकी गोलंदाजांना सहज फटके मारतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व भुवनेश्‍वर हे तीन गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकतील अशी अपेक्षा आहे.

फलंदाजीत मधल्या फळीचे अपयश ही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे. विजय शंकरच्या जागी स्थान मिळविलेल्या ऋषभ पंत याने येथील पहिल्या सामन्यात पंत याला मोठे यश मिळाले नसले तरी त्याला आज पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे.

भारताने आतापर्यंत बांगलादेशविरूद्ध 36 सामन्यांपैकी 29 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांना बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साहजिकच बांगलादेशचे खेळाडू येथे चांगली झुंज देतील असा अंदाज आहे. या स्पर्धेत सातत्याने फलंदाजीत चमक दाखविणारा शकीब अला हसन हा त्यांचा मोठा आधारस्तंभ आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 476 धावा केल्या असून दहा गडीही बाद केले आहेत. त्याच्याबरोबरच तमिम इक्‍बाल, महमदुल्लाह, लिट्टन दास यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे. गोलंदाजीत मात्र त्यांना अपेक्षित यश मिळविता आलेले नाही. तीच त्यांच्यासाठी समस्या आहे. कर्णधार मशरफे मोर्तझा याला या स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकच गडी बाद करता आलेला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

भारत – विराट कोहली (कर्णधार),लोकेश राहुल, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, विजय शंकर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत.

बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्‍बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)