दीपक चहर चमकला; भारताचा २-१ ने मालिका विजय

नागपूर : वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि शिवम दुबे यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी तिस-या व निर्णायक टी-२० सामन्यात बांगलादेशचा ३० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ ने खिशात घातली.

विजयासाठी १७५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १९.२ षटकांत १४४ धावांवरच आटोपला. भारताकडून गोलंदाजीत दीपक चहरने शानदार गोलंदाजी करत ३.२ षटकांत ७ धावा देत ६ गडी बाद करत भारताला विजय मिळवून दिला. दीपक चहरने या सामन्यात हटट्रीक घेतली तसेच टी-२० मधील सर्वोत्तम कामगिरी आपल्या नावे केली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. याशिवाय शिवम दुबेने ४ षटकांत ३० धावा देत ३ गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. तर युजवेंद्र चहलने ४ षटकांत ४३ धावा देत १ गडी बाद केला. बांगलादेशकडून मुहमद नईमने ४८ चेंडूत ८१ धावा करत एकतर्फी झुंज दिली, पण संघास विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. त्याला शिवम दूबेने बाद करत भारताचा विजय सुकर केला. याशिवाय मोहम्मद मिथून याने २७ धावा केल्या.

तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १७४ धावा केल्या आहेत.

प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारताची सुरूवात खराब झाली. दुस-या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेला सलामीवीर रोहित शर्मा आजच्या सामन्यात केवळ २ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शिखर धवनसुध्दा १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या के एल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केल्या. के एल राहुलने ३५ चेंडूत ७ चौकारासह ५२ तर श्रेयस अय्यरने तडाखेबंद फलंदाजी करत ३३ चेंडूत ३ चौकार व ५ षटकांरासह ६२ धावा केल्या. त्यानंतर आलेला ञषभ पंत केवळ ६ धावांवर बाद झाला. मनीष पांडेने १३ चेंडूत २२ धावा करत संघाची धावसंख्या १७४ पर्यंत नेली.

बांगलादेशकडून गोलंदाजीत शफीउल इस्लाम आणि सौम्य सरकार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. अल-अमीन होसैन याने १ गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)