Ind vs Ban 1st Test (Day 2 Stumps) : भारत आणि बांगलादेश यांच्यात चेन्नईत सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताची स्थिती मजबूत झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 3 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 33 तर ऋषभ पंत 12 धावांवर नाबाद आहेत. रोहित शर्मा (05), विराट कोहली (17) आणि यशस्वी जैस्वाल (10) यांच्या रूपाने भारताला 3 मोठे धक्के बसले आहेत. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज, नाहिद राणा आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची एकूण आघाडी 308 धावांची झाली आहे. भारताच्या पहिल्या डावातील 376 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 227 धावांची आघाडी मिळाली होती.
Stumps on Day 2 in Chennai!#TeamIndia move to 81/3 in the 2nd innings, lead by 308 runs 👌👌
See you tomorrow for Day 3 action 👋
Scorecard – https://t.co/jV4wK7BOKA#INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EmHtqyg9W3
— BCCI (@BCCI) September 20, 2024
बांगलादेशचा पहिला डाव 149 वर आटोपला…
बांगलादेशला पहिल्या डावात 149 धावांवर रोखण्यात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा होता. यॉर्कर किंगने 11 षटकांत 50 धावा देताना 4 बळी घेतले. याशिवाय आकाश दीपने 5 षटकात 19 धावा देत 2 बळी घेतले. या दोघांनी बांगलादेशचे कंबरडे मोडले. यानंतर सिराज आणि जडेजाने उर्वरित काम पूर्ण केले. सिराजने 10.1 षटकात 30 धावा एका मेडन ओव्हरसह 2 बळी घेतले.तर फिरकीपटू रवींद्र जडेजाने 8 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले.
बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक 32 धावा केल्या. त्याने 64 चेंडूंचा सामना करत 5 चौकार मारले याशिवाय लिटन दासने 42 चेंडूत 22 धावा तर मेहदी हसन मिराजने नाबाद 27 धावा केल्या. कर्णधार नजमुल हुसेन शांतो 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब सुरुवातीनंतर संघाला सावरता आले नाही आणि भारतीय गोलंदाजांनी दबावही कमी होऊ दिला नाही. अशा प्रकारे संपूर्ण संघ 149 धावांवर गडगडला.
भारताची पहिल्या डावात 376 धावांपर्यत मजल…
चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. पहिल्या दिवशी भारताने 6 गडी गमावून 339 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी बांगलादेशी गोलंदाजांनी पुढील 37 धावांत उर्वरित चार विकेट घेत भारताला 400 धावांचा टप्पा ओलांडण्यापासून रोखले. रवींद्र जडेजाचे शतक हुकले असले तरी रविचंद्रन अश्विनने शतक पूर्ण केले आणि तो 113 धावांवर बाद झाला. यावेळी अश्विन मैदानातून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना संपूर्ण स्टेडियमने त्याच्या सन्मानार्थ टाळ्या वाजवल्या.
एकवेळ 144 धावांत 6 विकेट गमावणाऱ्या टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा गाठणेही कठीण वाटत होते. पण रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील 199 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियानं पहिल्या डावात 376 धावा करताना सामन्यात पुनरागमन केलं.