#AUSvIND 3rd T20 :  अतीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतावर मात

सिडनी – कर्णधार विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतरही भारतीय संघाला मंगळवारी यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या ( #AUSvIND 3rd T20 ) टी-20 सामन्यात 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह यजमान संघाने सामना जिंकला तर, भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. हार्दिक पांडया मालिकावीर तर मिचेल स्वेपसन सामन्याचा मानकरी ठरला.

ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 187 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 20 षटकांत 7 बाद 174 असा रोखला गेला. कोहलीने एकहाती किल्ला लढवताना 61 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 85 धावांची खेळी केली. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांचा हिरो ठरलेला हार्दिक पंड्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला व भारताला सामना गमवावा लागला. त्याने 13 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारांसह 20 धावा केल्या.  या व्यतिरिक्त शिखर धवनने 28(21) तर शार्दुल ठाकूरने नाबाद 17(7)  धावा केल्या. भारताचे इतर प्रमुख फलंदाज लोकेश राहुल 0(2), श्रेयस अय्यर 0(1) आणि संजू सॅमसन 10(9) हे अपयशी ठरले.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्वेपसनने 4 षटकांत 23 धावा देताना सर्वाधिक 3 गडी बाद करत संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. तर  ग्लेन मॅक्सवेल, अॅडम झम्पा आणि ऍण्ड्रयु टाय य़ांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

तत्पूर्वी , भारताने टाॅस जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं.  त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 5 गडी गमावत 186 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. फिरकीपटू वाॅश्गिंटन सुंदरने फिंचला  पांड्याकरवी झेलबाद करत शून्यावर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर मॅथ्यू वेड आणि स्मिथने डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 65 धावा जोडल्या. स्मिथला  24(23) धावांवर त्रिफळाचित करत सुंदरने  ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. स्मिथ बाद झाला तेव्हा त्यांच्या 9.4 षटकांत 79 धावा झाल्या होत्या.

स्मिथ बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडने मॅक्सवेल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या  18.2  षटकांत 169 पर्यंत नेली.  मॅथ्यू वेडला पायचित करत शार्दुलने ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. वेडने 53 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारांसह 80 धावा केल्या. त्यानंतर  लगेचच मॅक्सवेल बाद झाला. त्याने 36 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 3 चौकार व 3 षटकार लगावले.  त्यानंतर डार्सी शाॅर्ट 7(3) धावांवर धावबाद झाला.  मोइसेस हेनरिक्सने नाबाद 5(2) आणि डॅनियल सॅम्स नाबाद 4(2) धावा करत 20 षटकांत संघाची धावसंख्या 186 पर्यंत नेली.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत वाॅश्गिंटन सुंदरने 4 षटकांत  34 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. तर नटराजन आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 1 गडी बाद केला. नटराजनने  4 षटकांत 33 तर शार्दुलने  4 षटकांत 43 धावा दिल्याय दिपक चाहर आणि युजवेंद्र चहल यांना एकही गडी बाद करता आला नाही.  चाहरने 4 षटकांत 34 तर  चहलने 4 षटकांत 41 धावा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.