भारत, व्हिएतनाम गुंतवणुकीसाठी चीनला पर्याय

“आशिया आर्थिक संवाद 2021′ परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्‍त केल्या भावना

पुणे – करोनामुळे अनेक जागतिक कंपन्या चीनमधून बाहेर पडून अन्य पर्याय शोधत आहेत. त्यात भारत आणि व्हिएतनाम या देशांचा गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने विचार होत आहे, असे मत एका परिसंवादात व्यक्‍त करण्यात आले.

आशिया आर्थिक संवाद 2021 या कार्यक्रमांतर्गत “बिल्डींग रिलायेबल ग्लोबल सप्लाय चेन्स’ या विषयावरील परिसंवादात भारत व व्हिएतनाम च्या उद्योगक्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्‍वस्त व एफ -फाइव्हचे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी अध्यक्षस्थान भूषवले.

बजाज ओटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज म्हणाले, भारत आणि व्हिएतनाम हे देश उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत असताना चीनलादेखील पूर्णपणे टाळणे हिताचे ठरणार नाही. स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने याबाबत विचार करायला हवा. बजाज ऑटो तीनचाकी वाहनांची सर्वात मोठी उत्पादक कंपनी असून या कंपनीने 2001 पासून एक मोठे स्थित्यंतर अनुभवले. भारतातील परवडणारी स्कूटर तयार करण्यापासून ते उच्च तंत्रज्ञानाधारित मोटरसायकलची जागतिक बाजारपेठ व्यापण्यापर्यंत कंपनीने मजल मारली. हा विस्ताराचा प्रवास बजाज यांनी सविस्तर विशद केला. 

व्हिएतनाममधील सोव्हिको उद्योगसमूहाचे अध्यक्ष डॉ. ग्युएन थान्ह म्हणाले, करोना संकटाला व्हिएतनामने समर्थपणे तोंड देऊन साथ आटोक्‍यात ठेवली. त्यामुळे कंपनीला जागतिक स्तरावरील कंपन्यांबरोबर काम करता आले. जपान, अमेरिका, कोरिया, तैवान व सिंगापूर येथील कंपन्या व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करत आहेत. व्हिएतनाम सरकारचे या प्रकल्पांसाठी चांगले पाठबळ मिळत असून या सरकारने पायाभूत संरचना प्रकल्पांसाठी मोठी गुंतवणूक केली आहे.

महिंद्रा उद्योगसमुहाचे डॉ. इंबोम चोई म्हणाले, डिजिटल स्थित्यंतरामुळे बॅंकिंग, ऑनलाइन किरकोळ वस्तूविक्री, जलद रेस्टॉरंट सेवा या क्षेत्रांत मोठे बदल होत आहेत. करोनामुळे ग्राहकांच्या वर्तनात बरेच बदल होत आहेत. त्यामुळेच हे स्थित्यंतर घडते आहे. दक्षिण कोरियाचे सरकार डिजिटल आणि हरित अर्थव्यवस्थेला पाठबळ देत आहे.

मित्सुबिशी कॉर्पोरेशन इंडियाचे मामोरू योको यांनीदेखील भारत व व्हिएतनाम हे जगातील प्रमुख उत्पादन व पुरवठा केंद्र म्हणून उदयाला येतील या मताला दुजोरा दिला. जगातील कंपन्यांसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठही असेल, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.