भारत- अमेरिका व्यापार वाढविणार

वाशिंग्टन – भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापार वाढत असताना करोना व्हायरसमुळे वाहतुकीत अडथळे आले होते. आता दोन्ही देश पुन्हा व्यापार वाढविण्याबाबत अनेक पातळ्यांवर प्रयत्न करणार आहेत.

अमेरिका आणि भारत व्यापार धोरण मंच पुन्हा सुरू करण्याबाबत तयारी करीत आहेत असे दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त पत्रकात म्हटले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका भेटीवर असताना या विषयावर दोन्ही बाजूकडून सविस्तर चर्चा झाली आहे.

भारत व अमेरिकेचे इतर क्षेत्रातील संबंध वाढत आहेत. मात्र व्यापार वाढल्याशिवाय या संबंधांना खऱ्या अर्थाने बळकटी येणार नाही असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. दोन्ही देशांदरम्यान कोणत्या क्षेत्रात व्यापार वाढविला जाऊ शकतो, या संदर्भातील अभ्यास चालू आहे.

त्या क्षेत्रात दोन्ही देशादरम्यान व्यापार वाढविण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुढील वर्षी दोन्ही देशातील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे. दोन्ही देशातील कंपन्या परस्परांच्या देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत.

आगामी काळात ही गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही देशातील कुशल व्यावसायिक, विद्यार्थी, गुंतवणूकदार, व्यापारी यांनी परस्परांच्या देशात प्रवास करावा यासाठी चालना देण्यात येणार आहे. औषधी, जैवतंत्रज्ञान, सेमीकंडक्‍टर, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील व्यापार साखळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. भविष्यात जे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, या क्षेत्रातही दोन्ही देशांनी सहकार्य करण्याबाबत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.