अहमदाबादच्या नमस्ते ट्रम्प कार्यक्रमात ट्रम्प यांचे प्रतिपादन
अहमदाबाद – इस्लामिक कट्टरपंथीयांच्या दहशतवादापासून लोकांचे रक्षण करण्यासाठी भारत आणि अमेरिका वचनबद्ध आहेत असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सर्वोत्कृष्ट व्यापार समझोैता करण्याचा प्रयत्न सुरू आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे आणि आम्ही भारताशी निष्ठावान राहु अशी ग्वाहीही ट्रम्प यांनी यावेळी दिली.
अहमदाबाद मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम मध्ये ट्रम्प यांच्या स्वागताचा हा कार्यक्रम नमस्ते ट्रम्प या नावाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ट्रम्प सहकुटुंब उपस्थित होते. भारतात सहअस्तित्वाची मोठी परंपरा आहे आणि विविध धर्मिय लोक येथे गुण्यागोविंदाने राहात आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यांचा येथे आदर केला जातो, मानवी मुल्यांची जपणूक केली जाते आणि येथे कायद्याचे राज्य आहे असा उल्लेख करीत ट्रम्प यांनी भारताचा गौरव केला. पंतप्रधान मोदींच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. ते म्हणाले की त्यांचे जीवन हे विलक्षण संघर्षाचे आहे. त्यांनी एक चहा विक्रेता म्हणून जीवनाची सुरूवात केली असून तेथपासून ते या पदावर पोहचले आहेत. ते आपल्या देशासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.
दहशतवाद आणि त्या मागच्या तत्वज्ञानाच्या विरोधात भारत आणि अमेरिका लढत असून त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. दहशतवादी गटांवर कारवाई करता यावी म्हणूनच आमचे सरकार पाकिस्तानशी सहकार्याने काम करीत आहे असेही त्यांनी नमूद केले. अमेरिका हा भारताच्या संरक्षण विषयक प्रगतीत भागीदार बनेल असे नमूद करून ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये मंगळवारी तीन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण विषयक करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.
भारताशी लवकरच व्यापार समझोैता केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले त्याचवेळी या बाबतीत मोदी हे टफ निगोशिएटर आहेत असेही त्यांनी नमूद केले. भारत हा लवकरच जगातील सर्वाधिक मध्यमवर्गीय असलेल्यांचा देश होईल आणि भारतातील गरीबीचे पुढील दहा वर्षात निमुर्लन होईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे स्वागत केले.
भारत-अमेरिका दरम्यानचे संबंध केवळ भागीदारी नाही तर त्या पलिकडे अत्यंत व्यापक, घट्ट आणि दृढ असे भावबंध आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारत आणि अमेरिका या दोन्ही लोकशाही देशांदरम्यान असलेल्या सामायिक मूल्यांचा आणि आशा-आकांक्षाचाही त्यांनी उल्लेख केला. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अधिक दृढ झाले आहेत असे सांगून ट्रम्प यांचा हा दौरा या संबंधांचा नवा अध्याय निर्माण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.