India -UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती (यूएई) दौऱ्यात भारत आणि यूएईदरम्यान ऊर्जा, संरक्षण, जहाजवाहतूक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण करारांवर शुक्रवारी स्वाक्षऱ्या झाल्या. याशिवाय, यूएईने भारतात ५ अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणाही केली. पंतप्रधान मोदी आणि यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्यात अबुधाबी येथे उच्चस्तरीय चर्चा झाली. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत ऊर्जा सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले. पेट्रोलियम साठा वाढविण्याबाबत करार – दोन्ही देशांमध्ये सामरिक पेट्रोलियम साठा वाढविण्याबाबत करार झाला. त्यानुसार यूएईचा भारतातील सामरिक तेलसाठ्यातील सहभाग ३० दशलक्ष बॅरलपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तसेच भारतात एलएनजी आणि एलपीजी साठवण सुविधांबाबतही सहकार्य करण्यात येणार आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा दीर्घकालीन पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र एलपीजी करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संरक्षण क्षेत्रात दोन्ही देशांनी सामरिक भागीदारीचा आराखडा निश्चित केला असून, संरक्षण उद्योग, तंत्रज्ञान हस्तांतरण, नवकल्पना, सागरी सुरक्षा, सायबर संरक्षण आणि लष्करी उपकरणांच्या संयुक्त निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. इतर करार – याशिवाय गुजरातमधील वाडीनार येथे जहाज दुरुस्ती केंद्र उभारणे, बंदरे व किनारी पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य, तसेच जहाज दुरुस्ती कौशल्य विकासाबाबतही करार झाले. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उच्च कार्यक्षम संगणकीय क्षमता वाढविण्यासाठी सुपर-कम्प्युटिंग क्लस्टर उभारण्याबाबत करारनामा करण्यात आला. दोन्ही देशांनी सीमाशुल्क आणि बंदर यंत्रणांना जोडणाऱ्या व्हर्च्युअल ट्रेड कॉरिडॉरच्या कार्यान्वयनाचे स्वागत केले. यामुळे मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले. पश्चिम आशियातील तणावाच्या मुद्द्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यूएईवरील हल्ल्यांचा निषेध करताना मोदी यांनी “यूएईला लक्ष्य करणे मान्य नाही,” असे स्पष्ट केले. तसेच पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी पुढील दौऱ्यासाठी नेदरलँडकडे रवाना – अबुधाबी विमानतळावर अध्यक्ष अल नाह्यान यांनी स्वतः मोदी यांचे स्वागत केले. विशेष सन्मान म्हणून मोदी यांच्या विमानाला यूएईच्या लष्करी विमानांनी एस्कॉर्ट दिला. यूएई दौरा आटोपल्यानंतर मोदी पुढील दौऱ्यासाठी नेदरलँडकडे रवाना झाले.