#U19CWC : भारतीय युवा संघाचा न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय

तीनही सामने जिंकत भारताचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

ब्लोमफोंटेन : गतविजेत्या भारतीय संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव करत विजय मिळविला आहे. यासह भारतीय संघाने ‘क’ गटात तिन्ही सामने जिंकत ६ गुणांसह अव्वल स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होत. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २३ षटकांत बिनबाद ११५ अशी मजल मारली होती. पण, त्यानंतर पावसामुळे सामन्याचा वेळ वाया गेल्याने डकवर्थ लुईसनुसार न्यूझीलंडला २३ षटकांत १९२ धावांच आव्हान देण्यात आलं. भारताकडून यशस्वी जैस्वालने ७७ चेंडूत (४ चौकार व २ षटकार) ५७ तर दिव्यांश सक्सेनाने ६२ चेंडूत (६ चौकार) ५२ धावा केल्या.

प्रत्युत्तरात विजयासाठी १९२ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव २१ षटकांत १४७ धावांवर आटोपला आणि त्यांना ४४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडकडून फलंदाजीत रियास मारियुने सर्वाधिक ४२, फर्गस लेलमैनने ३१, ओली वाईटने १४ आणि बेखम वीलर ग्रीनआॅलने १३ धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजीत रवि बिश्नोईने ५ षटकात ३० धावा देत ४ तर अथर्वा अकोंलेकरने ५ षटकात २८ धावा ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि सुशांत मिश्राने प्रत्येकी १ गडी बाद करत महत्वपूर्ण योगदान दिले.

फिरकीपटू रवी बिश्नोई सामन्याचा मानकरी ठरला. आता भारतासमोर उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. हा सामना मंगळवारी (२८ जानेवारी) होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here