U19 Asia Cup IND vs UAE Highlights : अंडर-19 आशिया कप 2024 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने युएई (UAE) चा 10 गडी राखून पराभव केला आहे. यासह भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. प्रथम फलंदाजी करताना यूएईने भारतासमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने अवघ्या 16.1 षटकांत सामना जिंकला.
India U19 unleashed sheer dominance, defeating UAE U19 by 10 wickets! The Indian bowlers dismantled the opposition, and the openers showed no mercy, chasing it down with brutal aggression. A flawless performance by the Boys in Blue! 🔥#ACC #ACCMensU19AsiaCup pic.twitter.com/77NfznoskM
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) December 4, 2024
शारजाहच्या मैदानावर यूएईने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संघाला 44 षटकात सर्व बाद केवळ 137 धावा करता आल्या. यूएईसाठी मुहम्मद रायनने सर्वाधिक 35 धावांची खेळी खेळली तर सलामीवीर अक्षत राय 26, एथन डिसोझा 17 आणि उदीश सुरीनं 16 धावांचे योगदान दिलं. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजांला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून युधजीत गुहाने 3 तर चेतन शर्मा आणि हार्दिक राजने प्रत्येकी 2 बळी घेतले. केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात भारताने 16.1 षटकांत एकही विकेट न गमावता 143 धावा करत लक्ष्य गाठले. सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी अर्धशतके झळकावली. वैभवने 46 चेंडूत 76 धावांची तर आयुषने 51 चेंडूत 67 धावांची खेळी केली. वैभवने आपल्या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार तर आयुशनं 4 षटकार आणि 4 चौकार लगावले.
पाक 180 धावांनी विजयी…
दुसरीकडे याच स्पर्धेतील अन्य लढतीत (11व्या सामन्यात) बुधवारी पाकिस्तानने जपानचा 180 धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 50 षटकात 6 गडी गमावून 243 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी गोलंदाजांसमोर जपानला 28.3 षटकांत सर्वबाद 68 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना सामना 180 धावांनी गमवावा लागला. पाकनं या लढतीसह उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
उपांत्य फेरीतील लढतीचे चित्र स्पष्ट…
साखळी फेरीनंतर आता उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अ-गटातून पाकिस्ताननं सर्व सामने जिंकत 6 गुणासह तर भारताने 3 पैकी 2 सामने जिंकताना 4 गुणासह उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे ब-गटात श्रीलंकेने सर्व 3 सामने जिंकून 6 गुणांसह तर बांगलादेशनं 3 पैकी 2 सामने जिंकताना 4 गुणासह उपांत्य फेरी गाठली आहे. आता पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानसमोर बांगलादेशचे तर दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असेल.
SF1 : पहिली उपांत्य फेरी : पाकिस्तान वि. बांगलादेश
(6 डिसेंबर 2024, सकाळी 10.30 वाजता, दुबई)
SF2 : दुसरी उंपात्य फेरी : श्रीलंका वि. भारत
(6 डिसेंबर 2024, सकाळी 10.30 वाजता, शारजाह)
Final : अंतिम फेरी : SF1 विजेता वि. SF2 विजेता
(8 डिसेंबर 2024, सकाळी 10.30 वाजता,दुबई)