नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा फटका फुटबाॅल स्पर्धेलाही बसला आहे. करोना विषाणू संसर्गाच्या चिंतेमुळे भारताच्या 16 वर्षाखालील फुटबाॅल संघाचा तझाकिस्तानचा दौरा रद्द करण्यात आला आहे.
भारतीय संघ 5 मार्च रोजी मैत्रीपूर्ण फुटबाॅल लढतीत सहभागी होण्यासाठी तझाकिस्तानला रवाना होणार होता, मात्र तझाकिस्तानने कोरोना विषाणू संसर्गाच्या चिंतेमुळे भारतासह 35 देशातील नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबत तझाकिस्तान फुटबाॅल फेडरेशनने भारतीय फुटबाॅल महासंघास ई-मेल केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी महत्वाच्या मानल्या जात असलेल्या जर्मन ओपन आणि पोलंड ओपन या बॅडमिंटन स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुढील काही महिन्यात या विषाणूचा प्रादूर्भाव कमी झाला नाही तर, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात येण्याचीही शक्यता आहे.