India-US Reciprocal Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॅनडा, मेक्सिको या देशांवर अमेरिकेने 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लागू केले आहे. तर भारत आणि चीन या देशांवर 2 एप्रिलपासून टॅरिफ लागू करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. टॅरिफच्या मुद्यावर भारत-अमेरिकेमध्ये उच्चस्तरीय चर्चा देखील सुरू आहे. मात्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहवालात टॅरिफचा भारतावर फारसा परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
एसबीआयच्या अहवालानुसार, अमेरिकेच्या टॅरिफचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे भारताने आपल्या निर्यातीत विविधता आणली आहे. तसेच, मूल्यवर्धनावरही भर दिला जात आहे.
भारताकडून व्यापारासंदर्भात इतर पर्याय शोधले जात आहे. मध्य पूर्वेतून युरोप ते अमेरिकेपर्यंत नवीन व्यापार मार्गांवर भारत काम करत आहे. तसेच, नवीन पुरवठा साखळी निर्माण केली जात असल्याने याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारताची एकूण निर्यात 3 ते 3.5% कमी होऊ शकते. मात्र, उत्पादन आणि सेवा दोन्ही क्षेत्रांमध्ये निर्यातीत सुधारणा आवश्यक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
एसबीआयच्या अहवालात मुक्य व्यापार कराराचाही (Free Trade Agreements – FTA) उल्लेख आहे. गेल्या 5 वर्षांत भारताने मॉरिशस, यूएई, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांसोबत 13 एफटीए केले आहेत. याशिवाय, भारत, यूके, कॅनडा आणि युरोपियन युनियन (EU) सोबत FTA वर देखील चर्चा करत आहे.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 2 एप्रिलपासून रेसिप्रोकल टॅरिफ लागू करणार असल्याचे म्हटले आहे. भारताकडून अमेरिकेच्या वस्तूंवर प्रचंड कर आकारला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. दोन्ही देशांमध्ये या मुद्यावरून चर्चा सुरू आहे. त्यामुळे लवकरच याबाबत तोडगा निघण्याची शक्यता आहे.