नवी दिल्ली – २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेतून नेमबाजी खेळाला हटवण्यात आल्याने भारतासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. अशामध्ये भारत मोठे पाऊल उचलण्याचे संकेत भारतीय ऑलम्पिक संघटनेने दिले आहेत.
भारतीय ऑलम्पिक संघटनेने म्हंटले कि, नेमबाजीला कॉमनवेल्थ स्पर्धेतून हटवल्याच्या विरोधात आम्ही मोठे पाऊल उचलू शकतो. कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभागी न होण्यासारखा कठोर निर्णय घेण्यास भारताला भाग पडू शकते. गुरुवारी आयोजित कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत राष्ट्रकुल खेळामधून नेमबाजी वगळण्याचा निर्णय घेतला गेला. या बैठकीत वगळण्यात खेळाऐवजी तीन नवीन खेळ समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये महिला क्रिकेटचाही समावेश आहे.
दरम्यान, २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे कॉमनवेल्थ स्पर्धा पार पडली. यात भारताने एकूण ६६ पदकांची कमाई केली होती आणि त्यापैकी १६ पदके नेमबाजीतून आली होती. भारताने २०१८ मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पदकतालिकेत तिसरे स्थान पटकावले होते. अशामध्ये यजमान इंग्लंड देशाने नेमबाजीला वगळल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.