भारताने शस्त्रसंधी भंगावरून पाकिस्तानला खडसावले

नवी दिल्ली – सातत्याने शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती करत असल्यावरून भारताने पाकिस्तानला कडक शब्दांत खडसावले. पाकिस्तानी सैनिकांकडून नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या लगत भारतीय हद्दीत वारंवार मारा केला जातो. त्याचा तीव्र निषेध भारताने केला.

भारत आणि पाकिस्तानमध्ये 2003 या वर्षी शस्त्रसंधी करार झाला. मात्र, त्या कराराचा भंग करत पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत मारा करण्याचे सत्र अवलंबले जाते. चालू वर्षी जून अखेरपर्यंत पाकिस्ताननेतब्बल 2 हजार 432 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्या घटनांमध्ये 14 भारतीय मृत्युमुखी पडले, तर 88 जखमी झाले. त्याचा संदर्भ घेऊन भारताने शेजारी देशाला सुनावले. जम्मू-काश्‍मीरमध्ये

दहशतवाद्यांना घुसवण्यासाठी भारतीय जवानांचे लक्ष विचलित करण्याच्या उद्देशातून पाकिस्तानी सैनिकांकडून मारा केला जातो. त्याबद्दल भारताकडून तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. मात्र, कुठल्या पातळीवरून भारताने पाकिस्तानला खडसावले ते तातडीने स्पष्ट होऊ शकले नाही. पाकिस्तानी माऱ्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांकडून अवलंबले जाते. त्या प्रत्युत्तरात अनेकदा पाकिस्तानी बाजूची मोठी हानी होते. मात्र, त्यातून पाकिस्तान धडा घेत नसल्याचेच त्या देशाच्या कुरापतींमधून स्पष्ट होते.

Leave A Reply

Your email address will not be published.