नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना विषाणू चांगलाच पसरला असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत चीनमध्ये या विषाणूमुळे 80 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारतात जयपूर येथे रविवारी कोरोनाची लागण झालेला एक संशयीत रुग्ण आढळून आला आहे. चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला या आजाराची लागण झाली आहे. जयपूरमधील सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. भारतात परतल्यानंतर त्याच्यामध्ये या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत.
राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी सवाई मानसिंह वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला याबाबत खबरदारीचे आदेश दिले आहेत. चीनहून एमबीबीएसचे शिक्षण घेऊन भारतात परतलेल्या या संशयीत विद्यार्थ्यावर स्वतंत्र खोलीत उपचार केले जात आहेत. तसेच त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तपासणीचे निर्देशही देण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासनाने या संशयीत रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे तपासणीसाठी पाठवले आहेत.