बालासोर – अण्वस्त्रांचा मारा करण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या शौर्य या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची आज ओडिशा येथील प्रक्षेपण स्थळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.
या क्षेपणास्त्राची क्षमता एक हजार किमी अंतरावरील लक्ष्यावर मारा करण्याची आहे. तसेच दोनशे किलोची अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. जमीनीवरील लक्ष्याला जमीनवरून मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम चाचणी स्थळावरून दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र 10 मीटर लांब, 74 सेंटीमिटर व्यासाचे व 6.2 टन वजनाचे आहे. हे क्षेपणास्त्र बंगालच्या उपसागरावरील लक्ष्यावर सोडण्यात आले आणि त्याने अचूक वेध घेऊन चाचणी यशस्वी केली असे वैज्ञानिकांनी सांगितले.
हे क्षेपणास्त्र प्रक्षेपण साध्या ट्रकवरूनही केले जाऊ शकते त्यामुळे ते लष्करी वापरासाठी सोयीचे आहे. हे क्षेपणास्त्र उपग्रहाच्या मॅपिंगमध्येही दिसू शकत नाही. त्यामुळे ते सीमेच्या कोणत्याही भागात नेणेही सोयीचे आहे.