जगात युद्धसदृश परिस्थिती दिसते. त्यामुळे भारताकडे 90 ते 110 अणुबॉम्ब असावेत, जे सध्या पुरेसे आहेत. मात्र, आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत त्यांच्या मदतीने आपण युद्ध करण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहोत का?
अणुयुद्ध लढण्याकरिता आण्विक ट्रायड/आण्विक त्रिसूत्री ही एक लष्करी संकल्पना आहे, ज्यामध्ये तीन भाग असतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे म्हणजे जमिनीवर आधारित आण्विक क्षेपणास्त्रे, आकाशातून हल्ला करणारी स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स म्हणजे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र असलेले विमान आणि पाणबुडी-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, आण्विक-क्षेपणास्त्र-सशस्त्र पाणबुड्या. ही क्षमता आता भारताकडेही आहे. भारतीय नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेल्या आयएनएस अरिघात या पाणबुडीतून अण्वस्त्रक्षम साडेतीन हजार किमी पल्ल्याच्या के-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या चाचणीने चीनच्या मुख्य भूभागातील बराचसा भाग प्रहार टप्प्यात येईल. यातून भारताची आण्विक ट्रायड अधिक बळकट झाली आहे. आण्विक युद्धात प्रतिहल्ला चढविण्यासाठी अजून एक प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे.
भारताची अणुशक्तीवर चालणारी आयएनएस अरिघात ही दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. तीन महिन्यांपूर्वीच ती नौदलात सामील झाली. या पाणबुडीतून 27 नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाने अण्वस्त्रक्षम साडेतीन हजार किमी मारक क्षमतेचे के-4 क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी केली. पाण्याखालील क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली हे अत्यंत कठीण काम आहे. पाणबुडीतून डागलेल्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण क्षमता सिद्ध करण्यासाठीची चाचणी हे महत्त्वाचे पाऊल आहे. यात शस्त्रप्रणालीचे परिचालन व तांत्रिक मापदंड सिद्ध केले जातात.
के-4 क्षेपणास्त्र काय आहे?
नौदलाच्या अरिहंत वर्गातील पाणबुड्यांसाठी संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेले के-4 हे साडेतीन हजार किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र जे स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या के मालिकेतले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ‘के’ आद्याक्षरावरून त्याचे नामकरण करण्यात आले आहे. विकसित क्षेपणास्त्राची 2014 आणि 2016 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती व आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता प्रमाणित करण्यात आली. घन रॉकेट प्रणोदकावर ते आधारित आहे. या क्षेपणास्त्रात तीन घटकांना परस्परांना जोडणारी प्रणाली आहे, ज्यामुळे शत्रूला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतून के-4 क्षेपणास्त्राचा माग काढणे आणि त्यास नष्ट करणे कठीण होईल.
अनेक तांत्रिक अडथळे पार करून के मालिकेतील या क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात आला. पाणबुडीतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता भारताच्या सामर्थ्यात सामरिक जोड देणारी ठरेल. या वर्गातील तिसरी आयएनएस अरिदमन ही पाणबुडी पुढील वर्षात कार्यान्वित होईल. त्यानंतर अणुशक्तीवरील दोन पाणबुड्या के-5 या पाच हजार किलोमीटर पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील.
आण्विक प्रतिबंधासाठी एक पाणबुडी नेहमी गस्तीवर असणे आवश्यक असते. देशाला किमान चार एसएसबीएनची गरज आहे. एखादी पाणबुडी बंदरात असताना, दुसरी गस्तीवर राहू शकते. आण्विक पाणबुडी अधिक काळ पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या देशाची आण्विक ट्रायड बळकट करतील. आण्विक प्रतिबंधन क्षमता वाढवून देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका निभावतील. पहिल्या आयएनएस अरिहंत पाणबुडीवर के-15 या 750 किमीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रांची चाचणी झाली होती.
भारताचे चीन किंवा पाकिस्तानशी अणुयुद्ध होईल का? याचा अंदाज कुठल्याही तज्ज्ञांना लावणे सोपे नाही. 1945 नंतर अणुबॉम्बचा वापर कोठेच झाला नाही, तरीपण पाकिस्तान व चीनकडून वेळोवळी मिळणार्या धमक्यापासून रक्षण करण्याकरता अणुयुद्धाची तयारी करणे गरजेचे आहे.
आकाशातून अणुबॉम्ब टाकण्याकरिता आपल्या हवाईदलात सुखोई, मिराज अशी विमाने सुसज्ज आहेत. ही सध्याच्या गरजेसाठी पुरेशी आहेत. अणुबॉम्ब जमिनीवरून फायर करण्याकरिता वाहने पृथ्वी 1, 2, (350 किमी), अग्नी 1 आणि अग्नी 2 (2000 किमी), अग्नी 3 (3000 किमी) शस्त्र म्हणून भारतीय सैन्यात सामील झालेले आहेत. अग्नी 4 (4000 किमी)ची मागच्या वर्षी टेस्ट करण्यात आली होती. जमिनीवरून फायर करण्याकरिता अग्नी 5 च्या रूपाने (5000 किमी) शस्त्र म्हणून सैन्यात येण्याकरिता अजूनसुद्धा 1-2 वर्षे लागू शकतात.
लष्करी आणि सुरक्षा क्षेत्रात पाकिस्तान भारतासोबत चीनच्या मदतीने ‘समानता’ विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. 1998 च्या भारताच्या आण्विक चाचण्यांनंतर पाकिस्ताननेही आण्विक चाचण्या घेतल्या. चीन पाकिस्तानच्या दोन आण्विक भट्ट्यांना मदत करत आहे. के-4ने सुसज्ज आयएनएस अरिघातच्या चाचणीने भारताची आण्विक प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यान्वित होत असली, तरी आण्विक पाणबुडीला मुख्यालयाशी तत्काळ संवाद साधता येईल, यासाठी प्रभावी प्रणाली उभारण्यासाठी काम करावे लागणार आहे.
अणुयुद्ध, पारंपरिक युद्ध आणि अपारंपरिक युद्धाची तयारी करणे खर्चाचे असते. म्हणून गरजेप्रमाणे प्राधान्य दिले जावे. आपण काश्मीरमधला आतंकवाद आणि ईशान्य भारतातील बंडखोरी आणि बंगलादेशी घुसखोरी थांबवण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतर सैन्याच्या शस्त्राचे आधुनिकीकरण पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अणुयुद्धाची तयारी पुढेही करता येऊ शकते. त्यासाठी संशोधन व आधुनिकीकरण चालू ठेवावे. जगात सध्या विविध ठिकाणी 60 हून अधिक युद्धे सुरू आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे आक्रमण करण्यास धजावत नाहीत. आपल्याला शांतता हवी आहे. पण आपणास सर्व प्रकारच्या लढाईकरता सदैव तयार रहाणे जरुरी आहे.