“भारताने आपली चूक सुधारून सीमेवर शांतता राखावी…”

सीमेवरील ताण कमी करण्याचा चेंडू चीनने भारताच्या कोर्टात टाकला

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील संबंध हे आता चांगलेच ताणले गेले आहेत. कारण अलीकडेच मॉस्कोमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात बैठक झाली. यावेळी पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशाच्या मंत्र्यांमध्ये पाच कलमी कार्यक्रमावर एकमत झाले होते. पण चीनने आता पुन्हा एकदा पलटी मारली आहे. तणाव कमी करण्याचा चेंडू भारताच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे आता चीनच्या या खेळीला भारत कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणे गरजेचे आहे.

चीनने सीमेवर शांतता ठेवण्याची सर्व जबाबदारी भारतावर ढकलली आहे. भारताने आपली चूक सुधारावी, प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलवर तणाव कमी करण्यासाठी पावले उचलावीत असे चीनने म्हटले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीनंतर बरोबर आठवडयाभराने चीनने ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे चीनवर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही.

सिनियर कमांडर्सच्या पुढच्या बैठकीची तारीख अजून दोन्ही बाजूंनी जाहीर केलेली नाही. दोन्ही देशांचे सैन्य आपआपल्या जागेवर कायम असून नियंत्रण रेषेवर स्फोटक स्थिती आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, पँगाँग सरोवराच्या परिसरात आतापर्यंत गोळीबाराच्या तीन घटना घडल्या आहेत.

“भारत-चीन सीमेवर घडलेल्या घटनांसाठी चीन जबाबदार नाही. ही सर्व जबाबदारी भारताची आहे. दोन्ही देशांमध्ये एकमताने जे ठरले होते, त्याचे तसेच कराराचे उल्लंघन भारताने केले आहे” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबीन यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाख सीमेवरील स्थिती संदर्भात लोकसभेत माहिती दिल्यानंतर चीनकडून हे स्टेटमेंट आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.