#U19CWC : भारताचा जपानवर १० विकेटनी दणदणीत विजय

ब्लूफाँटेन : भारतीय संघाने १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जपानचा १० विकेट आणि ४५.१ षटके राखून पराभव करत विजय नोंदविला आहे. भारताचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय असून भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. भारताचा गोलंदाज रवि बिश्नोई हा सामन्याचा मानकरी ठरला आहे.

जपानचे ४२ धावांचे आव्हान भारताने अवघ्या ४.५ षटकांतच एकही विकेट न गमवता पार केले. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने १८ चेंडूत ५ चौकार व १ षटकारांसह २९ तर कुमार कुशाग्राने ११ चेंडूत २ चौकारासह १३ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार प्रियम गर्ग याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना जपानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. भारतीय गोलंदाजांनी अचूक गोलंदाजीचा मारा करत जपानचा डाव २२.५ षटकांत अवघ्या ४१ धावसंख्येवर गुंडाळला. जपानच्या ४१ पैकी १९ धावा (१२ वाईड व ८ एलबी) या अतिरिक्त होत्या. जपानच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विशेष म्हणजे जपानच्या ५ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. जपानकडून शू नोगुचीने ७, केंटो डोबेलने ७, मैक्सीमिलियनने ५ धावा तर मार्कस थरगटे, युघंधार रेथोरेकर आणि सोरा इचकीने प्रत्येकी १ धाव केली.

भारतीय संघाकडून गोलंदाजीत रवि बिश्नोईने ८ षटकांत ५ धावा देत सर्वाधिक ४ तर कार्तिक त्यागीने ६ षटकांत १० धावा ३ गडी बाद केले. आकाश सिंहने ४.५ षटकांत ११ धावा देत २ तर विद्याधर पाटीलने ४ षटकांत ८ धावा देत १ गडी बाद केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here