अमेरिकेचा धार्मिक स्वातंत्र्यविषयक अहवाल भारताने फेटाळला

भारतात मुस्लिमांवर हल्ले होत असल्याचे नोंदवले होते निरीक्षण

नवी दिल्ली – अमेरिकेने सन 2018 वर्षातील घडामोडींवर आधारीत धार्मिक स्वातंत्र्याच्या संबंधात एक अहवाल तयार केला आहे. त्यात भारतात अजूनही बीफच्या कारणावरून मुस्लिमांवर सामुहिक हल्ले होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तथापी भारताने मात्र हा अहवाल फेटाळून लावला आहे. विदेशातील अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अमेरिकेला काहीं एक अधिकार नसल्याची भूमिका भारताने घेतली आहे.

या अहवालाच्या संबंधात प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांवर प्रतिक्रीया देताना भारताच्या विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितले की, भारताला आपल्या सेक्‍युलर रचनेचा आणि तत्वांचा पुर्ण अभिमान आहे. आम्ही सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता या तत्वांशीही वचनबद्ध आहोत असेहीं त्यांनी म्हटले आहे. अल्पसंख्यांसह सर्वांनाच भारतीय घटनेने मुलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्यांची देशात जपणूक केली जाते असेही त्यांनी नमूद केले आहे.

आमच्या देशातील नागरीकांना घटनादत्त अधिकार असताना कोणत्याही अन्य त्रयस्थ देशाला आमच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीं असेही रविशकुमार यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या अहवालात जगातील अन्य देशांच्याही धार्मिक स्वातंत्र्याच्या संबंधात माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.