इस्लामी देशांच्या संघटनेचा दावा भारताने फेटाळला

जिनिव्हा – जम्मू आणि काश्‍मीरबाबत केलेल्या टिप्पणीबाबत भारताने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये पाकिस्तान आणि “ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ या इस्लाम देशांच्या संघटनेवर जोरदार टीका केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपिठाचा दुरुपयोग करणे ही पाकिस्तानची सवय बनली आहे.

पाकिस्तानकडून नेहमीच अशी खोटी आणि बदनामीकारक टिप्पणी केली जात असते. पाकिस्तानमधील दहशतवाद आणि सरकारकडून केल्या जात असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासारख्या गंभीर मुद्‌द्‌यांवरुन दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तानची ही जूनी सवय आहे, असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासातील प्रथम सचिव पवन बधे यांनी दिलेल्या प्रत्त्युत्तरात सांगितले.

जम्मू काश्‍मीरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत “युएनएचआरसी’ने लक्ष घालावे, असे “ओआयसी’ने म्हटले होते.पाकिस्तानला शिख, हिंदू, ख्रिश्‍चन आणि अहमदी या अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयश आले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य समाजाच्या हजारो मुलींचे अपहरण, बळजबरीने विवाह आणि धर्मांतर केले जात असते. नागरी गट, मानवी हक्कांचे रक्षणकर्ते आणि पत्रकारांचे आवाज दाबले जात असतात.

अशांचे अपहरण, हत्येच्या आधारे विरोधी आवाज दडपून टाकला जात असतो. यामुळे मानवी हक्कांबाबत पाकिस्तानच्या कटिबद्धतेतील फोलपणा स्पष्ट झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानकडून दहशतवादावादाला दिल्या जात असलेल्या पाठिंब्याचा मुद्दाही त्यांनी अधोरेखित केला. जम्मू काश्‍मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेत उपस्थित केल्याबद्दल भारताने “ओआयसी’वरही टीका केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.