नवी दिल्ली – भारत हा जगातील करोना विरोधी लसीचा सर्वात मोठा खरेदीदार देश बनणार आहे. भारताने आत्ता पर्यंत विविध लसींच्या एकूण 160 कोटी डोसची मागणी नोंदवली आहे असे सांगण्यात येत आहे. भारताने ऑक्सफर्ड – ऍस्ट्रा झेनका लसीचे 50 कोटी डोस खरेदी करण्याचे ठरवले असून नोवावॅक्स या अमेरिकन कंपनीकडून एक अब्ज डोस आणि रशियाच्या स्पुटनिक 5 चे 10 कोटी डोस खरेदी केले जात आहेत.
अमेरिकेच्या ड्युक युनिव्हर्सिटी ग्लोबल हेल्थ ईनोव्हेशन सेंटर कडून ही माहिती देण्यात आली आहे. भारताने 30 नोव्हेंबर पर्यंत 160 कोटी डोसची खरेदी केल्याची माहिती या संस्थेला मिळाली आहे. भारताच्या खालोखाल युरोपियन समुदायाने 1 अब्ज 58 कोटी डोस खरेदीची ऑर्डर दिली आहे. आणि अमेरिकेने शंभर कोटी डोसची मागणी नोंदवली आहे असेही या संस्थेने म्हटले आहे.
ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनकाची लस पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मध्येच तयार केली जात असून रशियाच्या स्पुटनिक 5 लसीचे उत्पादन हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबमध्ये केले जात आहे.त्या खेरीज भारत स्वता भारत बायोटेक मार्फत एक स्वतंत्र लस विकसित करीत असून या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या याच आठवड्यापासून सुरू होत आहे.
लसीची उपलब्धता ही आता समस्या राहिलेली नाही,पण त्याचे वितरण हे एक मोठे आव्हान असणार आहे. त्याच्या नियोजनाची भारतात तयारी सुरू आहे. पण त्या विषयीची माहिती मात्र या संस्थेच्या अहवालात नाही.