अंबाला -भारताच्या हवाई ताकदीमध्ये लक्षणीयरित्या भर घालणाऱ्या राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी उद्या (बुधवार) हरियाणाच्या अंबाला हवाई तळावर दाखल होणार आहे. त्या विमानांच्या स्वागतासाठी देश सज्ज झाला आहे. दरम्यान, अंबाला हवाई तळ परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून तिथे जमावबंदीही लागू करण्यात आली आहे.
फ्रान्समधून सोमवारी पाच राफेल विमानांच्या तुकडीने भारताच्या दिशेने उड्डाण केले. भारतात दाखल होण्याआधी ती विमाने संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) थांबली. प्रवासावेळी राफेल विमानांमध्ये हवेतच इंधन भरण्यात आले.
आता त्या विमानांच्या स्वागतासाठी अंबाला हवाई तळ सज्ज झाले आहे. त्या तळालगत असणाऱ्या गावांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित गावांमध्ये चार किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामस्थांना एकत्र येण्यास मनाई असेल.
संबंधित प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना हवाई तळाचे छायाचित्रण आणि व्हिडीओ चित्रण करण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याशिवाय, हवाई तळालगतच्या तीन किलोमीटर परिसरात खासगी ड्रोन उडवण्याला मनाई करण्यात आली आहे.