अब्जाधिशांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर

न्युयॉर्क – अमेरिका आणि चीन खालोखाल भारतात सर्वाधिक अब्जाधिश राहतात असा निष्कर्ष फोर्ब्स मासिकाच्या पहाणीत आढळून आला आहे. भारतात सध्या कमालीची विषमता वाढली असून श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत असून गरीब आधिक गरीब होत चालले आहेत असे जे सांगितले जात आहे त्याला पुष्टी देणाराच हा निष्कर्ष आहे असे मानले जात आहे. भारतातील मोजकेच म्हणजे 140 जण अब्जाधिशांच्या यादीत नोंदवले गेले आहेत.

फोर्ब्स मासिकाने आपल्या 35 व्या वार्षिक विशेषांकात जगभरातील अब्जाधिशांची एक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.त्यानुसार अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 724 अब्जाधिश आहेत. त्या खालोखाल चीन मध्ये 698 अब्जाधिश आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेत 614 अब्जाधिश होते तर चीन मध्ये 456 अब्जाधिश होते त्यांची संख्या आता वाढली आहे. जगात या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात एकूण 140 अब्जाधिश राहात आहेत.

या यादीतील माहिती नुसार मुकेश अंबानी यांनी अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे आपले बिरूद पुन्हा मिळवले आहे. गेल्यावेळी त्यांची ही जागा चीनचे जॅक मा यांनी मिळवली होती. पण आता मुकेश अंबानी यांची संपत्ती पुन्हा त्यांच्यापेक्षा जादा झाली आहे. ऍमेझॉन कंपनीचे प्रमुख जेफ बेझोस हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी लागोपाठ चौथ्या वर्षी आपले हे स्थान कायम राखले आहे. त्यांची एकूण संपत्ती 177 अब्ज डॉलर्स इतकी आहे. एक वर्षापुर्वी पेक्षा त्यांची संपत्ती 64 अब्ज डॉलर्सनी वाढली आहे.

स्पेस एक्‍स कंपनीचे एलॉन मस्क हे दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 151 अब्ज डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षी त्यांचे या यादीतील स्थान 31 वे होते. भारतातील मुकेश अंबानी हे जगातील दहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांची एकूण मालमत्ता ही 84.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. एक वर्षापुर्वी अंबानींची जागा घेणारे जॅक मा हे या यादीत आता 26 व्या स्थानावर गेले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत असणारे गौतम अदानी हे आता जागतिक क्रमवारीत 24 व्या स्थानावर आले आहेत. त्यांची मालमत्ता 50.5 अब्ज डॉलर्स इतकी आहे. करोनावर लस निर्माण करणारे सीरम इन्स्टिट्युटचे सायरस पुनावाला हे जागतिक क्रमावारीत 169 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण मालमत्ता 12.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. भारतातील अन्य अब्जाधिश व्यक्तींमध्ये डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी, कोटक बॅंकेचे प्रमुख उदय कोटक, लक्ष्मी मित्तल, कुमारमंगलम बिर्ला, दिलीप संघवी, सुनिल मित्तल यांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.