टेलिकॉम क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर

डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन

पुणे – जगात टेलिकॉमच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. या बदलांचा स्वीकार भारताने केला आहे. त्याच प्रमाणे टेलिकॉम क्षेत्राला लागणाऱ्या पायाभूत सुविधा येथे इतर देशांपेक्षा जास्त आहेत. म्हणूनच भारत हा टेलिकॉमच्या क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले.

एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटच्या 11व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड हे होते. कॅबेज सॉफ्टवेअरचे संजय पटवर्धन व भारती एअरटेलचे कौशिक गुप्ता हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. श्रीहरी होनवाड, कुलसचिव डी. पी. आपटे व डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.

डॉ. विजय भटकर म्हणाले, टेलिकॉमचा कल्पनातीत वेग चक्रावून टाकणारा आहे. शिवाय हा वेग प्रत्येक दशकात, किंबहुना प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे. पूर्वी एखादा बदल होण्यास 100 वर्षे लागत असतील तर तोच बदल आता 10 वर्षात होतो. विशेषकरून उगवती पिढी या बाबतीत अतिशय वाकबगार आहे. स्मार्ट फोन सारखी सुविधा त्यांनी अतिशय कमी काळात आत्मसात केली आहे. पुढील काळात माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नक्की काय घडामोडी घडतील याचा अंदाजसुध्दा करता येत नाही. भारताने सॉफ्टवेअरसारख्या सेवा क्षेत्रात कमीतकमी वेळात निर्यात करावयास सुरूवात केली आहे. आणि ही प्रक्रिया पुढेही तशीच चालू राहील. दरम्यान, यावेळी 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 101 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष हजर राहुन पदवी ग्रहण केली. मिटसॉटच्या 9 विभागातील 30 विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रा. जयदीप जाधव यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.